मुंबई : प्रकृती ठीक नसल्याने काही दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात दाखल आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर लीलावती रूग्णालयात पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


दरम्यान मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करणारं पत्र लिलावती रुग्णालयाने प्रसिद्ध केलं आहे. पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात गैरसमज निर्माण करणाऱ्या बातम्या दिसून आल्यामुळे लीलावती रुग्णालयाने पत्रक प्रसिद्ध करुन माहिती दिली आहे.

गेल्या 4 दिवसांपासून पर्रिकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. शिवाय पर्रिकर यांच्या उपचारांना बराच कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गोवा विधानसभेचं 22 दिवसांचं अधिवेशन फक्त 3 दिवस करावं, अशी मागणी गोवा भाजप करणार आहे.

फूड पॉयझनिंगच्या त्रासानंतर पोटात दुखू लागल्याने, प्रथमत: त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आलं आणि लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.