नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक लवकरच स्वगृही परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यांच्या विनंतीवरून कामगारांसाठी रेल्वेकडून शुक्रवारपासून देशभरात विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यातील काही ट्रेन धावल्या आहेत तर काही ट्रेन येत्या काही दिवसांत धावणार आहेत. लवकरच ज्या लोकांना आपल्या राज्यात परतण्याची इच्छा आहे अशांसाठी देखील परतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे.


देशात 40 दिवसांनंतर शुक्रवारी पहिली रेल्वे चालवण्यात आली. 1200 कामगारांना घेऊन जाणारी विषेश ट्रेन झारखंडमधील हतिया येथे पोहोचली. हैदराबादजवळील लिंगमपल्ली येथून ही विशेष गाडी सोडण्यात आली होती. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन या वेळी करण्यात आलं. या ट्रेनमधील सर्व कामगारांची जिल्ह्यातील कार्यालयात तपासणी होणार आहे. यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.


देशात काल कामगारांना घेऊन जाण्यासाठी या ट्रेन धावणार




  • तेलंगणा ते झारखंड

  • महाराष्ट्रातील नाशिक ते भोपाळ

  • राजस्थानमधील जयपूर ते बिहारमधील पाटणा

  • झारखंडची रांची ते राजस्थानची कोटा

  • केरळमधील अलुवा ते ओडिशामधील भुवनेश्वर पर्यंत


दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.


स्वगृही पाठवताना काय काळजी घेतली जाणार?


प्रत्येक राज्याने प्रवाशांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानांच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सोबतचं या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्‍या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे.