नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात धुडगूस घालणारा अतिरेकी रियाज नायकूला ठार मारण्यात लष्कराला यश आलंय. दोनच दिवसांपूर्वी हंदवाडा इथे झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. त्याचा बदला अवघ्या दोनच दिवसांत लष्करानं घेतलाय. बुऱ्हान वाणीच्या नंतर हिजबुलचा हा सर्वात मोठा अतिरेकी मारलं जाणं ही लष्करासाठी मोठी बाब मानली जातेय.


जम्मू काश्मीरमध्ये मोस्ट वाँटेंड अतिरेक्याचा खात्मा


हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नायूक याला ठार मारण्यात अखेर लष्कराला यश मिळालं. संपूर्ण देशात कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असले, अनेक जण घरी बसून काम करत असले तरी भारतीय लष्कराला मात्र ही उसंत नाही. रविवारपासूनच काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांनी पुन्हा डोकं वर काढलं. त्या चकमकीत लष्कराने एक कर्नल आणि मेजर दर्जाचा अधिकारीही गमावला होता. पण या शहीदांच्या चितेची आग शांत व्हायच्या आतच लष्करानं त्याचा बदला घेतला. गेल्या आठ वर्षांपासून लष्कराला चकवा देणारा अतिरेकी रियाज नायकू अखेर मारला गेला.

कोण होता हा रियाज नायूक?


बुऱ्हान वाणीचं एन्काऊंटर झाल्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीनची सूत्रं रियाज नायकूकडे आली होती. मोस्ट वाँटेंड अतिरेक्यांच्या यादीत ए प्लस प्लस ही कॅटेगरी सर्वात वरची असते. त्याच ए प्लस प्लस यादीत असलेल्या रियाज नायकूला पकडण्यासाठी 12 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. 1985 मध्ये जन्मलेला रियाज हा काश्मीर खोऱ्यातल्या सुशिक्षित असूनही शस्त्रं हाती घेणाऱ्यापैकी एक होता. काही दिवस गणिताचा शिक्षक म्हणूनही त्यानं काम केलं होतं. 2010 मध्ये आणि नंतर 2015 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक तरुणांची माथी भडकवण्याचं काम रियाजनं केलं होतं.


पुलवामा परिसरात कालपासूनच रियाजसाठी लष्कराने सापळा लावला होता. रियाज आपल्या आईला भेटायला येणार याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळालेली होती. त्यानुसार त्याच्या घराच्या आसपासचे सगळे बंकर, भुयारी मार्ग पोलिसांनी खणून ठेवले होतं. त्यासाठी या ऑपरेशनमध्ये 6 जेसीबीचाही समावेश करण्यात आला होता.


हिजबुल मुजाहिदनचा हा सर्वात मोठा अतिरेकी मारण्यात लष्कराला यश आलंय. अनेकदा कमांडर मारले जातात, पण नव्या नावानं पुन्हा संघटना उभ्या राहतात. रियाज नायकूच्या खात्म्यानं लष्कराला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे हिजबुलचं नेटवर्क खिळखिळंही होईल, असं सुरक्षा तज्ज्ञ सांगतायत. पण त्यासोबतच नवा रियाज निर्माण होऊ नये यासाठीही लष्कराला सतर्क राहावं लागणार आहे.