Lalu Prasad Yadav and Nitish Kumar : सध्या देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे विविध नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपविरोधी विरोधकांची एकजूट करण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, अशताच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लवकरच नितीश कुमार यांच्याबरोबर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 


2024 मध्ये पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवू 


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बिहारमधील महागठबंधन सरकार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लालू प्रसाद यादव यांनी त्यांना देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बिहारमधून त्यांचे सरकार गेल्यामुळं  अमित शाह हे नाराज आहेत. 2024 मध्येही तेच होणार आहे. म्हणूनच ते इकडे-तिकडे धावत असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये असताना त्यांनी काय केले? असा सवालही लालू यांनी उपस्थित केला. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत त्यांना विचारलेल्या असता ते म्हणाले की, होय, आम्ही 2024 मध्ये पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवू असेही लालू प्रसाद यादव म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले होते अमित शहा यांचे वक्तव्य


अमित शाह हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी एका सभेत बोलताना लालू प्रसाद यादव यांच्यासह नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. भाजपशी गद्दारी करून नितीशकुमार आता स्वार्थासाठी लालूंच्या मांडीवर बसले आहेत. माझ्या बिहारच्या दौऱ्यामुळं लालू आणि नितीश यांना पोटदुखी होत असल्याचंही शाह म्हणाले होते. तसेच यावेळी अमित शाहा यांनी बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.


नितीश कुमारांनी घेतली होती बड्या नेत्यांची भेट


मागच्या काही दिवसापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीवाल यांच्यसह अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ते विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. अशातच विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. विरोधी पक्षाचा  पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. अशातच ते आणि लालू प्रसाद यादव सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्यानं त्यांच्या या भेटीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


मोदींविरोधात पंतप्रधानपदाचा विरोधी पक्षांचा चेहरा कोण? नितीश कुमार म्हणाले...