हैदराबाद : तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांचे नाव निश्चित करण्यात आलं असून ते 7 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. सुरुवातीला रेवंत रेड्डी यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला, पण हाय कमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. 


न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आणि मुख्यमंत्री नियुक्तीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हाय कमांडवर सोडण्यात आला. या प्रकरणाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही पसंती रेवंत रेड्डी यांना असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी रेवंत रेड्डी यांचे नाव अंतिम करण्यात आलं. 
रेवंत रेड्डी यांचा विरोध


तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार असलेले रेवंत रेड्डी यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याची माहिती आहे. प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या विरोधानंतर सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा रद्द करावा लागल्याचीही चर्चा आहे. 


या नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना विरोध केला


रेवंत रेड्डी यांना विरोध केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, माजी सीएलपी नेते भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा समावेश आहे. या नेत्यांनी रेवंत रेड्डी यांच्या उमेदवारीला विरोध केला, भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे लक्ष वेधले.


रेड्डी यांना 2021 मध्ये तेलंगणा काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली, तेव्हा त्यांच्यासमोरही आव्हान होते. त्यांच्यावर हे पद मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप होता.


तेलंगणात काँग्रेसची निदर्शने


तेलंगणात एकूण 119 जागांपैकी 64 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बीआरएसने 39 तर भाजपने आठ जागा जिंकल्या आहेत. येथे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला 60 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसला 39.40 टक्के, बीआरएसला 37.35 टक्के आणि भाजपला 13.90 टक्के मते मिळाली.


रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (BRS) चे पी नरेंद्र रेड्डी यांचा 32,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.


ही बातमी वाचा: