'राईट टू प्रायव्हसी'चा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर काय फरक?
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2017 11:34 AM (IST)
डोळ्यांची बुब्बुळं किंवा बोटांचे ठसे यासारखी आधारशी लिंक्ड असलेली खाजगी माहिती लीक झाल्यास गुन्हेगार त्याचा गैरवापर करण्याची भीती आहे.
मुंबई : 'राईट टू प्रायव्हसी' म्हणजेच व्यक्तिगत गोपनियता हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. मात्र सरकार त्यावर काही बंधनं घालू शकतं, असंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. राईट टू प्रायव्हसी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या गोपनियतेला धक्का पोहचवणाऱ्या सरकारी आणि खाजगी कृत्यांना प्रतिबंध करणं, म्हणजेच राईट टू प्रायव्हसी. 150 हून जास्त देशांच्या संविधानामध्ये गोपनियतेचा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे. मात्र हा कायमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. वाढती गुन्हेगारी, दहशतवाद यांच्या पार्श्वभूमीवर एनएसए, सीआयए, रॉ यासारख्या सरकारी संस्था नागरिकांच्या राईट टू प्रायव्हसीमध्ये अडथळा ठरु शकतात. नागरिकांच्या प्रत्येक गोपनीय बाबींवर व्हर्च्युअली नजर ठेवत राईट टू प्रायव्हसी जपता येऊ शकते का, हा प्रश्न उपस्थित केला जातो. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम? आधार कार्ड अनेक सरकारी प्रक्रियांसाठी महत्त्वाचं ठरत आहे. डोळ्यांची बुब्बुळं किंवा बोटांचे ठसे यासारखी आधारशी लिंक्ड असलेली खाजगी माहिती लीक झाल्यास गुन्हेगार त्याचा गैरवापर करण्याची भीती आहे. त्यामुळेच आधारबाबत सुप्रीम कोर्टाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. मेसेज, फोटो यासारख्या गोष्टी दोन मोबाईल यूझर्सनी फक्त एकमेकांसोबत शेअर केलेल्या असतात. सर्व्हिस प्रोव्हाईडरने त्याचा अॅक्सेस घेऊन इतर बाबींसाठी वापर करणे, हा गोपनीयतेचा भंग आहे.