नवी दिल्ली : नोटबंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठा दिलासा दिला आहे. आजपासून जितक्या नव्या नोटा बँकेत भराल, तेवढी रक्कम बँकेतून काढण्यास मर्यादा नसेल. त्यामुळे महिनाअखेरीस सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आजपासून बँकेतून कितीही पैसे काढता

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा लादण्यात आली होती. मात्र, आता आठवड्याला 24 हजारापेक्षा जास्त रक्कम मोठी रक्कम काढता येईल. तुम्ही जितकी रक्कम नव्या चलनात म्हणजे रु. 500 आणि रु. 2000 च्या नव्या नोटांमध्ये बँकेत भराल, तेवढी सर्व रक्कम तुम्हाला काढता येईल. ही रक्कम 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात बँकेतून रक्कम मिळेल.

उदाहरणार्थ –

समजा तुम्ही आजपासून बँकेत 50 हजार रुपयांची रक्कम 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरुपात किंवा रु. 100 व त्यापेक्षा कमी नोटांमध्ये जमा केली. तर तुम्हाला बँकेतून 50 हजार रुपयांची रक्कम काढता येईल. इथे तुम्हाला आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची अट लागू होणार नाही.

https://twitter.com/RBI/status/803269826617569281

चलनतुटवडा निर्माण होऊ नये म्हणून आठवड्यात फक्त 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, आरबीआयने अट आता शिथील केली आहे. ज्यांच्याकडे 500 आणि 2000 च्या नव्या नोटा आहेत, त्यांना आता दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, देशभरातल्या बँकांमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत 33 हजार 948 कोटी रुपयांच्या जुना नोटा बदलण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तर 8 लाख 11 हजार 33 कोटी रुपयांची रक्कम बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे.

नोटाबंदीच्या घोषणेनंतर ग्राहकांनी बँकेतून काढलेल्या रकमेचीही माहिती आरबीआयनं दिली आहे. गेल्या 20 दिवसांत देशभरातल्या बँकांमधून 2 लाख 16 हजार 617 कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली.  सध्या ग्राहकांना पाचशेच्या जुन्या नोटा महत्त्वाच्या सेवांसाठी वापरता येणार आहे.