मुंबई : नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)चार सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. आरबीआयने मंगळवारी (29 जून) हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर 112.50 लाखांचा दंड आकारला.


भारतीय रिझर्व बँकेने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेवर 37.50 लाख रुपये आणि मुंबईच्याच सारस्वत सहकारी बँकेवर 25 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.


केंद्रीय बँकेच्या मते आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर 'ठेवीवरील व्याज दर' (Interest Rate on Deposits)आणि 'आपले ग्राहक ओळखा' (Know Your Customer)या संबंधित आरबीआय निर्देशांचं पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.  तर अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला 'ठेवीवरील व्याज दरा'वरील मास्टर निर्देशात असलेल्या निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.


एसव्हीसी सहकारी बँकेने 'ठेवीवरील व्याज दर' आणि 'फसवणुकीचे निरीक्षण व अहवाल देणारी यंत्रणा' (Frauds Monitoring and Reporting Mechanism) या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितलं. 'ठेवीवरील व्याज दर' आणि 'ठेव खाती देखभाल' (Maintenance of Deposit Accounts) या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सारस्वत सहकारी बँकेला दंड आकारण्यात आला.


आरबीआयने म्हटलं आहे की नियामक अनुपालनातील कमतरतेच्या आधारे हा दंड आकारण्यात आला आहे. यातून बँकांनी त्यांच्या ग्राहकांद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता दर्शवण्याचा हेतू नाही.


याआधीही तीन सहकारी बँकांवर कारवाई
दरम्यान काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने तीन सहकारी बँकांविरोधात कारवाई केली होती. आरबीआयने 22 जून रोजी तीन सहकारी बँकांवर विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 23 लाख रुपयांचा दंड आकारला होता. आरबीआयने मोगावीरा सहकारी बैंक लिमिटेडवर 12 लाख रुपये, इंदापूर शहरी सहकारी बँकेवर 10 लाख रुपये आणि बारामती सहकारी बँक लिमिटेड, बारामतीवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.