शामली : उत्तर प्रदेशमधील शामली येथील कस्बा कैराना या गावात प्रेमप्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे प्रेमात आंधळ्या झालेल्या एका व्यक्तीने पत्नीच्या सांगण्यावरून 11 हजाराची हाय व्होल्टेज वायर पकडून स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न केला. या अपघातात प्रेमवेड्या माणसाचा जीव तर वाचला पण त्याचे दोन्ही हात गमवावे लागले. आश्चर्याची बाब म्हणजे आता पत्नीचे कुटुंबीय तिला नदीमकडे पाठवण्यास तयार नाहीत.


पत्नीने ठेवली अट
कैराना गावात सुमारे सात वर्षांपूर्वी नदीम जवळच्या कस्बा कांधला येथील सायमा या मुलीच्या प्रेमात पडला होता. दोघांमध्ये सात वर्ष प्रेमसंबंधानंतर गेल्या वर्षी दोघांचे लग्न झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्नी नदीमला सोडून तिच्या माहेरी गेली. नदीमने परत बोलावल्यानंतर पत्नीने त्याची परीक्षा घेण्यास सुरुवात केली.


पत्नीच्या सांगण्यावरून हाय व्होल्टेज वायर पकडली
पत्नीने नदीमला विचारले की तो तिच्यासाठी काय करू शकतो? नदीन म्हणाला तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो. त्यावर पत्नीने नदीमसमोर 11 हजार हाय व्होल्टेज असलेली विद्युत तारेला स्पर्श करण्याची अट ठेवली. पत्नीच्या प्रेमापायी नदीमने पुढचा मागचा विचार न करता विद्युत तारेला स्पर्ध केला. या घटनेत नदीमचा जीव वाचला पण त्याचे दोन्ही हात कापण्यात आले.


कुटुंबातील सदस्यांचा मुलीला सासरी पाठवण्यास नकार
आता सायमाचे कुटुंबीय तिला नदीमबरोबर पाठवण्यास तयार नाहीत. यानंतर नदीम पत्नीला सासरी बोलावण्यासाठी थेट एसपीच्या ऑफिसात पोहोचला. अर्ज देऊन नदीमने सासरच्या मंडळींवर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. नदीम म्हणाला की तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि तो संपूर्ण आयुष्य तिचा चेहरा पाहून व्यतीत करेल.


नदीमने सांगितली सर्व कहाणी
पीडित नदीमने सांगितले की त्याचे मीटचे दुकान आहे. सायमा दुकानात यायची. याच दरम्यान दोघांनाही प्रेम झाले. कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर लग्न झाले. पण, काही कारणास्तव ती (सायमा) तिच्या घरी गेली आणि परत येण्याचे नाव घेत नव्हती. जेव्हा फोनवर बोललो तेव्हा ती (सायमा) अटी घालू लागली. तिने (सायमा) अट ठेवली की माझ्यासाठी तुम्ही काय करू शकता. त्यावर मी तुझ्यासाठी माझे प्राणही देऊ शकतो असे नदीमने सांगितले. पत्नीकडून प्रश्न आला की 11 हजार हाय व्होल्टेज वायरला हात लावू शकता का? नदीम म्हणाला की मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो आणि हाय व्होल्टेज वायर पकडली. अपघातामुळे त्याला त्याचे दोन्ही हात गमवावे लागले. पण, तरीही बायकोचा चेहरा पाहून संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याची तयारी असल्याचं नदीमने सांगितले.