हैदराबाद : देशभरात सध्या कोरोनासोबतच काळी बुरशी अर्थात ब्लॅक फंगसचाही कहर सुरु आहे. या आजाराने कोरोनाच्या या महामारीदरम्यान आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहेत. यावरील इलाज अतिशय महाग आहे. इतकंच नाही तर याच्यावरील उपचारांसाठी लागणारं इंजेक्शनही सहजरित्या उपलब्ध होत नाही.


याचदरम्यान आयआयटी हैदराबादमधून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयआयटी हैदराबादमधील संशोधकांनी ब्लॅक फंगसच्या इलाजासाठी प्रभावी ठरणारं एक सॉल्यूशन तयार केलं आहे. हे सॉल्यूशन रुग्णांना तोंडाद्वारे दिलं जाईल आणि याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या या रुग्णांना केवळ इंजेक्शन दिलं जातं.


दोन वर्षांच्या संशोधनानंतर संशोधकांचा या सॉल्यूशनवर आता पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यामते हे सॉल्यूशनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाऊ शकतं. या सॉल्यूशनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे औषध परवडणारं आहे. 60 मिलीग्रामच्या या गोळीची किंमत केवळ 200 रुपये है. 60 मिलीग्राचं औषध रुग्णासाठी अनुकूल असतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. 


आयआयटी हैदराबादमध्ये मागील दोन वर्षांपासून केमिकल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे प्रोफेसर सप्तऋषी मजुमदार, डॉ. चंद्र शेखर शर्मा आणि त्यांच्या पीएचडी स्कॉलर मृणालिनी गेधाने आणि अनंदिता लाहा हे कालाजारसाठी प्रभावी ठरणाऱ्या नॅनोफायब्रस AMB औषधावर काम करत होते.


"हे औषध मोठ्या प्रमाणात उत्पादित करण्यासाठी योग्य फार्मा कंपन्यांकडे दिलं जाऊ शकतं याबाबत इथले संशोधक दोन वर्षांच्या संशोधानंतर आश्वस्त आहेत, असं आयआयटी हैदराबादकडून सांगण्यात आलं आहे.


"देशात सध्या ब्लॅक आणि इतर प्रकारच्या बुरशीच्या उपचारांसाठी कालाजारवरील औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आम्ही बनवलेल्या औषधाची उपलब्धता आणि परवडणारे दर पाहता त्याच्या आत्पकालीन वापराची आणि तात्काळ परीक्षणाची परवानगी द्यावी, असंही संस्थेतर्फे सांगण्यात आलं.


ही टेक्नॉलॉजी बौद्धिक संपदा अधिकारापासून मुक्त आहे. जेणेकरुन याचं व्यापक स्तरावर उत्पादन व्हावं आणि नागरिकांना ते परवडेल आणि सहजरित्या उपलब्ध होईल, असं डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी म्हटलं.