Recruitment News: समजा तुम्ही विविध अॅप्टिट्यूड टेस्ट दिल्या. त्यानंतर कोडिंग टेस्ट दिली आणि मग इंटरव्ह्यूमध्ये उत्तीर्ण झाले. म्हणजे जवळपास तुम्ही तीन किंवा त्या पेक्षा जास्त परीक्षा नोकरी लागण्यासाठी दिल्या.  हे कमी की काय मग प्रत्यक्ष रुजू होण्यापूर्वी 5-6 महिन्यांची अन पेड इंटर्नशिप (म्हणजे 5-6 महिने फुकट काम ) केली. हे सगळं करून आता जेव्हा जॉयनिंगच्या तारखा आल्या तेव्हा तुम्हाला सांगितलं की, आता जॉयनिंग होणार नाही. यावर आपली रिअॅक्शन काय असेल? डोकंच काम करणार नाही ना? असंच सध्या अनेक कंपन्यांमध्ये अनेक उमेदवारांसोबत घडलंय. तशी चर्चा देखील अनेक जण लिंक्ड इन सारख्या समाज माध्यमांवर सुरु आहे.  


फ्रेशर्सना पत्र पाठवून दिला धक्का


अनेक कंपन्या ऑन बोर्डिंगच्या तारखा पुढे ढकलत आहेत आणि उशीर करत आहेत. जे विद्यार्थी हा मुद्दा उपस्थित करतात आणि कंपन्यांना याबाबत मेल करतात त्यांचा ऑफर लेटर मेल रिजेक्ट होत आहे. विप्रो, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांनी काही महिन्यांपूर्वी फ्रेशर्सना ऑफर लेटर पाठवले होते. त्यानंतर ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. जवळपास तीन ते चार महिने उलटून गेले. यानंतर आता कंपन्यांनी फ्रेशर्सना पत्र पाठवून जोरदार धक्का दिला आहे.


सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ऑनबोर्डिंगला उशीर 


मोठ्या टेक दिग्गजांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ऑनबोर्डिंगला उशीर केल्यामुळे अनेक पदवीधरांनी आता वेगवेगळ्या नोकऱ्या शोधण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला आहे. ऑनबोर्डिंग विलंबामुळे आगामी कॅम्पस प्लेसमेंटवर प्रभाव पडतोय. प्लेसमेंट झालेल्या शेकडो फ्रेशर्सना यामुळे धक्का बसला आहे. प्लेसमेंट होऊन देखील ऑफर लेटर न आल्याने आनंदित झालेल्या शेकडो फ्रेशर्सच्या आनंदावर विरजण पडले आहे.


शेकडो उमेदवारांना फटका


शेकडो पदवीधरांना टेक दिग्गजांकडून ऑफर मिळाल्या होत्या. परंतु आता ऑनबोर्डिंग प्रक्रियेत सुमारे 3-4 महिन्यांच्या विलंबानंतर त्यांची पत्रे रद्द केली जात आहेत.एका अहवालानुसार विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी सुमारे 3-4 महिन्यांपूर्वी टॉप टेक कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज केला होता आणि मुलाखतींच्या फेऱ्यांनंतर त्यांना ऑफर लेटर  मिळाली होती. कंपन्यांनी शेकडो उमेदवारांना पाठवलेली ऑफर लेटर रद्द केली आहेत. त्यामुळे तीन-चार महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या शेकडो उमेदवारांना याचा फटका बसला आहे.


येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटवर देखील परिणाम


भारतीय IT कंपन्या नवीन पदवीधरांच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेस विलंब करत आहेत. मात्र लंबित ऑनबोर्डिंग प्रक्रियेमुळे देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी आयटी पदवीधरांना गमवाव्या लागतात, कारण ऑनबोर्डिंग विलंब सहा महिन्यांपेक्षा जास्त असल्याने नंतर इतर नोकऱ्या शोधत आहेत. या व्यतिरिक्त, विद्यार्थी आणि महाविद्यालये यांना भीती आहे की या चाललेल्या विलंबामुळे येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटवर देखील परिणाम होऊ शकतो.


नवीन भरतीच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेस  विलंब


गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक दिग्गजांनी देखील त्यांच्या नवीन नियुक्त्या रोखल्या आहेत आणि खर्चात कपात करण्याचा विचार करीत आहेत. भारतीय कंपन्या त्याचप्रमाणे नियोजन करत आहेत.बाजारातील मंदीचा सामना करण्यासाठी, बर्‍याच कंपन्या नियुक्त्या गोठवत आहेत आणि त्यांच्या कंपनीची  पुनर्रचना करत आहेत. त्यामुळे या कंपन्या नवीन भरतीच्या ऑनबोर्डिंग प्रक्रियेस 3-4 महिन्यांनी विलंब करत असल्याचं दिसून येतंय.