नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात सर्व विक्रम मोडलेले आहेत. पण, हा विक्रम नकोसाच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य विभागानं याबाबतची माहिती दिली. देशातील रुग्णसंख्येचा हा आकडा सध्या परिस्थिती किती गंभीर आहे, याचीच जाणीव करुन देत आहे.
आरोग्य मंत्रायलयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत 630 रुग्णांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. तर, 59 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येचा हा आकडा पाहता देशात येत्या काळात काही महत्त्वाचे आणि तितकेच कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात.
काय आहे देशातील कोरोनाची स्थिती?
एकूण कोरोना रुग्ण - 1 करोड़ 28 लाख 1 हजार 785
एकूण डिस्चार्ज- 1 करोड़ 17 लाख 92 हजार 135
एकूण सक्रिय रुग्ण - 8 लाख 43 हजार 473
एकूण मृत्यू - 1 लाख 66 हजार 177
एकूण लसीकरण- 8 करोड़ 70 लाख 77 हजार 474
CoronaVirus | परदेशातून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांसाठी प्रशासनाची सुधारित कार्यपद्धती
एक वेळ अशी होती, जेव्हा देशात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली होती. 1 फेब्रुवारीला 8635 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दिवसभरात आढळलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या होती. पण, आता मात्र चित्र काहीसं धास्तावणारं आहे. आतापर्यं देशात 25 कोटी 14 लाख लोकांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आल्याही माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत दिवसभरात 55 हजारांची भर
मंगळवारी राज्यात आज 55 हजार 469 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर, 34 हजार 256 कोरोना बाधितांनी या संसर्गावर मात केली. एकूण 25 लाख 83 हजार 331 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. राज्यात एकूण 47 लाख 2283 अॅक्टिव्ह रुग्ण असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.98 झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.