मुंबई : रिझर्व्ह बँकेने सर्वांना धक्का देत रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत. रेपो दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता रेपो दर 6.25 टक्के कायम असेल.

रिझर्व्ह बँकेचं द्विमासिक पतधोरण आज जाहीर झालं.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे विकास दर 7.6 टक्क्यांवरुन 7.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याची चिन्हं आहेत.

इतकंच नाही तर कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च ) महागाई दर धोक्याच्या पातळीवर आहे.

दुसरीकडे नोटाबंदीमुळे चलन तुटवड्याच्या शक्यतेचा परिणाम विकासदरावरही होण्याचे संकेत आहेत.

रिजर्व बँकेने आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना, नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. नोटाबंदीमुळे 2016-2017 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास दर 7.1 टक्के असेल असा अंदाज वर्तवला. नोटाबंदीपूर्वी विकासदर 7.6 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

नोटाबंदीमुळे रिटेल, हॉटेल-रेस्टॉरंट आणि वाहतुकीसारख्या क्षेत्रात काहीकाळ मंदी जाणवण्याची शक्यताही रिजर्व बँकेने व्यक्त केलीय.

तसंच नोटाबंदीचा निर्णय हा घाईगडबडीत घेण्यात आलेला नसल्याचंही रिजर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर गांधी म्हणाले. रिजर्व बँकेने तब्बल चार लाख कोटी नव्या नोटांचा पुरवठा केला आहे. तसंच सध्या बँकासाठी अडचणीचा ठरत असलेला इंक्रिमेंटल सीआरआर येत्या दोन तीन दिवसात म्हणजे 10 डिसेंबरपर्यंत रद्द होईल, असंही रिजर्व बँकेकडून सांगण्यात आलं.

यापुढेही नव्या नोटांचा पुरवठा बँकाना केला जाणार आहे. असं सांगून उर्जीत पटेल यांनी चलनातून बाद झालेल्या तब्बल 11.55 लाख कोटी नोटा बँकांकडे परत आल्याचीही माहिती दिली.

सध्याची परिस्थिती निवळल्यानंतर एटीएम आणि बँकातून रक्कम काढण्यावर असलेले निर्बँधही मागे घेण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं. तसंच नजिकच्या भविष्यकाळात रू. 1000 ची नोट पुन्हा चलनात आणण्याविषयी काहीच निर्णय अजून झालेला नसल्याचंही डेप्युटी गव्हर्नरांनी सांगितलं.

रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

संबंधित बातम्या

रेपो रेट म्हणजे काय?