नवी दिल्ली : जवानांसाठी लागणाऱ्या बुलेट प्रुफ जॅकेटसाठीचा कच्चा माल चीनमधून आयात करण्यात येत असल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार सुरेंद्र नागर यांनी जवानांच्या बुलेट प्रुफ जॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चायनिज कच्चा मालाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. जवानांसाठीचं बुलेट प्रुफ जॅकेट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल चीन आणि तैवानमधून आयात केला जातो, असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं. तसंच यातील 30 टक्के कच्चा माल भारतात बनलेलाच वापरण्याचे निर्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.


यानंतर समाजवादी पक्षाचेच खासदार रामगोपाल यादव यांनी बुलेट प्रुफ जॅकेट्सच्या कमतरतेवर संरक्षणमंत्र्यांना प्रश्न विचारला. यावर 2009 साली आपल्या सैन्यातील जवानांकडे 3 लाख 64 हजार जॅकेट्स असल्याचं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानंतर आदेश देऊनही मागणी पूर्ण होऊ न शकल्याचंही ते पुढे म्हणाले. मोदी सरकार पहिल्यांदा 2016 मध्ये सत्तेत आल्यानंतर 1 लाख 86 हजार जॅकेट्स खरेदी करण्याचा आदेश दिल्याचंही त्यांनी उत्तर देताना स्पष्ट केलं. तसंच 2018 साली एका भारतीय कंपनीसोबत यासाठी करार केल्याचंही ते म्हणाले.

येत्या एप्रिल 2021 पर्यंत जवानांना ही 1 लाख 86 हजार बुलेट प्रुफ जॅकेट्स पुरवली जातील अशी आशा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. तर 2019 अखेरपर्यंत 37000 जॅकेट्सही जवानांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.