Raveena Tandon : आज प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सिने-अभिनेत्री रवीना टंडनला (Raveena Tandon) 'पद्मश्री पुरस्कार' (Padma Award) जाहीर झाला आहे. रवीनाने 1992 साली 'पत्थर के फूल' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता. 


परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक सिनेमांचा रवीना टंडन भाग आहे. रविना 1990 च्या दशकामधील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. पण 2001 साली 'दमन' या सिनेमासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 2003 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'सत्ता' या सिनेमातील अभिनयाने समीक्षकांनी कौतुक केले आहे. 






एकाच वेळी तीन सुपरहिट सिनेमे देणारी अभिनेत्री


रवीना टंडनने 1994 साली एकाच वेळी तीन सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अक्षय कुमारसोबत मोहरा, अजय देवगणसोबत दिलवाले आणि सलमान खान आणि आमिर खानसोबत अंदाज अपना अपना यांसारख्या सुपरहिट सिनेमांमुळे रवीना टंडन अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्री झाली. एकाच वेळी तीन सिनेमे सुपरहिट देणाऱ्या रविनाचे तिन्ही सिनेमे भिन्न आहेत. त्यामुळे त्यावेळी तिच्या अभिनयाचेदेखील प्रचंड कौतुक झाले होते. 






बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' अशी रवीना टंडनची ओळख आहे. वयाच्या 21 व्या वर्षी तिने बॉलिवूड सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. सिनेसृष्टीत यश मिळाल्यानंतर तिने दोन मुलींना दत्तक घेतले. छाया टंडन आणि पूजा टंडन या दोन मुलांचा रवीनाने एकटीने सांभाळ केला आहे. 


रवीनाचे 1998 साली आठ सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'बडे मियां छोटे मियां' हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला होता. शूल, बुलंदी, अक्स सारख्या सिनेमासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या


Suman Kalyanpur : सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण जाहीर; जाणून घ्या त्यांचा प्रवास...