अलाहाबाद : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल हे सध्या बरेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात आज अलाहाबादमध्ये राष्ट्रीय हिंदू संघटनने जोरदार आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. तसंच जो कोणी त्यांची जीभ कापून आणेल त्यांना 10 लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशीही घोषणा या संघटनेनं केली आहे.

कुलभूषण जाधव यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करणं ही अतिशय शरमेची बाब आहे. 'यापुढे त्यांनी अशाप्रकारची वादग्रस्त विधानं करु नयेत यासाठी त्यांची जीभ कापली गेली पाहिजे.' असं वक्तव्य या संघटनेचे संयोजक सत्येंद्र सिंह यांनी केलं आहे.

याचवेळी त्यांनी नरेश अग्रवाल यांची जीभ कापून आणणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं. नरेश अग्रवाल यांचं राज्यसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशीही मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली.

खासदार नरेश अग्रवाल नेमकं काय म्हणाले होते?

'जर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना दहशतवादी ठरवलं आहे तर ते त्याच पद्धतीनं त्यांच्याशी वर्तणूक करणार. मला समजत नाही की, मीडिया फक्त कुलभूषण जाधव यांच्याबाबतच का बोलते? पाकिस्तानमध्ये इतरही भारतीय नागरिक कैदी म्हणून आहेत त्यांच्याबाबत का बोललं जात नाही?' असं वादग्रस्त विधान नरेश अग्रवाल यांनी केलं आहे.