नवी दिल्ली : ‘नारायण राणे यांनी त्यांच्या मतदारसंघात सुसज्ज असं हॉस्पिटल सुरु केलं आहे. त्याच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत आले होते.’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिली.
दानवेंनी असा दावा केला असला तरी, नारायण राणे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात अर्धा तास चर्चाही झाली. मात्र, या बैठकीत नेमकं काय झालं हे अद्याप समजू शकलेलं नाही.
या बैठकीनंतर बाहेर आल्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दानवेंनी अजब दावा केला. ‘राणे हे हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी दिल्लीला आले होते. पंतप्रधान मोदींनी उद्धाटनाला यावं अशी त्यांची इच्छा आहे. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.’ असं दानवे म्हणाले.
‘राणे आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते माझ्या घरी आले होते. अनेकदा मी देखील त्यांच्या घरी जातो. इथं कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.’ असंही दानवे यावेळी म्हणाले.
सुरुवातीला राणे, रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हे तिघेही अमित शाह यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर राणेंची अमित शाहांसोबत अर्धा तास बैठक झाली. त्यामुळे भाजपची दारं राणेंसाठी खुली झाली आहेत का? याबाबत जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दुसरीकडे राणेंना भाजपमध्ये घेण्यास एक गट उत्सुक नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे राणे यांच्याबाबत भाजप नेमकी काय भूमिका घेतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. मात्र, राणे हे फक्त हॉस्पिटलच्या उद्धाटनाचं निमंत्रण देण्यासाठी आले होते ही बाब काही पटण्यासारखी नाही.
हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी राणे दिल्लीत : दानवे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 10:35 PM (IST)
‘राणे हे हॉस्पिटलच्या उद्घाटनाचं आमंत्रण देण्यासाठी दिल्लीला आले होते. पंतप्रधान मोदींनी उद्धाटनाला यावं अशी त्यांची इच्छा आहे. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.’ असं दानवे म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -