चंदीगड : निवडणूक जवळ येताच भारतीय राजकारण विकासाच्या रुळावरुन घसरुन जात आणि धर्मावर आलं आहे. भाजपवर धर्म आणि जातीयवादाचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने स्वतःच आता आगामी निवडणुकांआधी ब्राह्मण कार्ड खेळलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाच्या एका संमेलनाला संबोधित केलं. काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए आहे, असं म्हणत सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावरही भाष्य केलं.
काँग्रेसच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए : सुरजेवाला
“काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो, तिरंगा आणि काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासोबत ब्राह्मण संमेलनाचं आयोजन का केलं जात आहे, अशी विचारणा माझ्या एका सहकाऱ्याने केली. मी सांगितलं की याचं उत्तर एक दिवस व्यासपीठावरुन देईल. काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तातच ब्राह्मण समाजाचा डीएनए आहे,” असं सुरजेवाला म्हणाले.
सत्ता आल्यास ब्राह्मण विकास महामंडळ : सुरजेवाला
आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदान करावं, असं आवाहन सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाला केलं. शिवाय हरियाणामध्ये सत्ता आल्यास ब्राह्मण विकास महामंडळाची स्थापना करु, असंही ते म्हणाले. सत्ता आल्यास ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन सुरजेवाला यांनी दिलं.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने लिंगायत कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर आता हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत काँग्रेस पक्षातच ब्राह्मणांचा डीएनए असल्याचं म्हटलं आहे.