नवी दिल्ली : एशियाड गेम्समध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी पैलवान दिव्या काकरानने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं तेव्हा तुम्ही बोलावलं, एशियाडच्या तयारीसाठी काही मदतीची तुमच्याकडे मागणी केली. मात्र नंतर माझा फोनही उचलला नाही, असं ती म्हणाली.


''राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी सुवर्ण पदक जिंकलं तेव्हा माझ्यासाठी काहीही केलं नाही. मुख्यमंत्र्यांना सांगितलं की गरीबांच्या मुलांसाठी काही तरी केलं पाहिजे. जेव्हा खुप गरज असते, तेव्हा आमच्यासाठी कुणीही काही करत नाही,'' अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिव्याने दिली.

''हरियाणाकडे पाहा, तिथे खेळाडूंना किती सपोर्ट केला जातो. तिथे तीन कोटी रुपये मिळतात आणि आमच्याकडे 20 लाख रुपये. हरियाणामध्ये तूप-दूध आहे म्हणतात. तूप-दूध तर दिल्लीतही आहे, पण इथे सपोर्ट नाही,'' असं म्हणत दिव्याने राजकारण्यांवर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, अरविंद केजरीवालांनी याबाबत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला जबाबदार धरलं. ''आतापर्यंत जी धोरणं होती, त्यात अनेक त्रुटी होत्या. यात सुधारणा आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आमच्या कामात अडचणी आणल्या जातात. अगोदर आमचे निर्णय वरती जाऊन रखडले जायचे, मात्र आज आम्ही काम करु शकतो, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे,'' असं केजरीवाल म्हणाले.

यापूर्वी एबीपी न्यूजशी बोलतानाही दिव्याने दिल्ली सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. पदक जिंकल्यानंतर अभिनेते अनिल कपूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या, पण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या नाही, असं दिव्या म्हणाली. दिव्या अत्यंत गरीब कुटुंबातील असून दिल्लीतील एका छोट्याशा घरात तिचं कुटुंब राहतं.

उत्तर प्रदेश सरकारने कांस्य पदकासाठी 20 लाख रुपये दिले आहेत, तर हरियाणा सरकारने कांस्य पदकासाठी 75 लाख दिलेत. हरियाणा सराकरकडून सपोर्ट केला जातो, असं दिव्या म्हणाली. दिव्या 2011 पासून नोव्हेंबर 2017 पर्यंत दिल्लीसाठी खेळत होती, मात्र सुविधांच्या अभावामुळे तिने यूपीकडून खेळण्याचा निर्णय घेतला.