हिस्सार (हरियाणा) : देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेला स्वयंघोषित गुरु रामपाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर आज कोर्टानं त्याच्यासह 15 जणांना जन्मठेप सुनावलीय. आपण संत कबीरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आश्रम काढले. 2006 पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २०१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
2014 मध्ये अटक, हिस्सारमध्ये हिंसाचार
हिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने रामपालच्या अटकेचे आदेश दिले होते. मात्र आश्रमात घुसून रामपालला अटक करण्यास नोव्हेंबर 2014 मध्ये समर्थकांनी पोलिसांना जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलिस आणि समर्थकांमध्येही धुमश्चक्री उडाली. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले.
अखेर पोलिसांनी जीवाचं रान करुन तीन दिवसांनी बाबा रामपालला अटक केली होती. आश्रमाच्या दारावर अॅम्ब्युलन्स नेऊन पोलिसांनी रामपालला थेट अॅम्ब्युलन्समधूनच नेलं. यावेळी बाबा रामपालच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.
बाबा रामपालची फिल्मी स्टोरी
स्वत:ला संत कबीरांचा अवतार आणि परमेश्वर घोषित करणाऱ्या रामपालची कहाणी, एखाद्या हिंदी सिनेमाच्या स्टोरीप्रमाणेच आहे. रामपाल हा त्याच्या समर्थकांसाठी नायक आहे, तर इतरांसाठी खलनायक. मात्र कायद्याच्या नजरेत तो एक आरोपी आहे.
हिस्सारमध्ये 2006 साली झालेल्या एका हत्या प्रकरणात, रामपालला 2008 मध्ये जामीन मिळाला होता. मात्र त्यानंतर तो एकदाही न्यायालयात हजर झाला नव्हता.
रामपालच्या समर्थकांनी ऑगस्ट 2014 मध्ये हिस्सार जिल्हा न्यायालयात हुल्लडबाजी केली होती. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने रामपालला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. इतकंच नाही तर जामीन रद्द का करु नये, अशी विचारणाही केली होती.
इंजिनिअर ते संत
रामपालचा जन्म 1951 मध्ये सोनीपतमधील धनाणा गांवात झाला. रामपाल हरियाणा सरकारच्या जलसंपदा विभागात ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम काम करत होता. नोकरीदरम्यानच रामपाल दास सत्संग करता करता संत रामपाल झाला.
हरियाणा सरकारने रामपालला 2000 मध्ये राजीनामा देण्याचा आदेश दिला. यानंतर मग रामपालने करोंथा गावांत सतलोक आश्रम सुरु केला. हाच आश्रम सध्या सरकारच्या ताब्यात आहे.
हरियाणातील हिस्सारजवळच्या बरवालाजवळ हा आश्रम आहे. आश्रमाच्या जमिनीच्या वादामुळे रामपालवर अनेक आरोप आहेत.
रामपाल आणि वाद
रामपाल यापूर्वी अनेक वादांमुळे चर्चेत होता. इस्लाम धर्माचे प्रचारक डॉ. झाकिर नाईक आणि अन्य धर्म गुरुंवर केलेल्या टीकांमुळे रामपाल चर्चेत होता.
रामपालने 2006 मध्ये स्वामी दयानंद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या समर्थकांमध्ये, सतलोक आश्रमाबाहेरच राडेबाजी झाली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.
या राडेबाजीनंतर पोलिसांनी रामपालला हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं होतं. तब्बल 22 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर, रामपाल 30 एप्रिल 2008 रोजी बाहेर आला.
सुप्रीम कोर्टाचे आदेश
सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये रामपालची जप्त केलेली जमीन त्याला परत करण्याचे आदेश हरियाणा सरकारला दिले होते. यानंतर महिनाभरातच आश्रमाबाहेर पुन्हा दंगल उसळली. या दंगलीत आणखी दोघांचा मृत्यू झाला.
हिस्सार हिंसा : रामपालसह 15 जणांना जन्मठेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2018 01:12 PM (IST)
स्वत:ला संत कबीरांचा अवतार आणि परमेश्वर घोषित करणाऱ्या रामपालची कहाणी, एखाद्या हिंदी सिनेमाच्या स्टोरीप्रमाणेच आहे. रामपाल हा त्याच्या समर्थकांसाठी नायक आहे, तर इतरांसाठी खलनायक. मात्र कायद्याच्या नजरेत तो एक आरोपी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -