Ram Mandir Pran Pratishtha: आज ऐतिहासिक दिवस... आज प्रभू श्रीरामचंद्राची अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) विधीवर प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) होणार आहे. ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे, त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीनं वातावरण राममय झालं आहे. 


सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी 12:15 ते 12:45 या वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक होण्याची शक्यता आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा शुभ मुहूर्त 84 सेकंदांचा आहे, जो 12:29 मिनिटं 8 सेकंदापासून सुरू होईल आणि 12:30 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत असेल. याच वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. 23 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.


आज प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा कसा पार पडणार? 


सर्वात आधी नित्यपूजा, हवन पारायण, नंतर देवप्रबोधन, त्यानंतर प्रतिष्ठा पूर्वाकृती, नंतर देवप्राण प्रतिष्ठा, महापूजा, आरती, प्रसादोत्सर्गा, उत्तरांगकर्म, पूर्णाहुती, आचार्यांचं गोदान, कर्मेश्वरपण, ब्राह्मण भोजन, प्रशात्का, ब्राह्मण पुण्य, दान, दान, पूजन असे कार्यक्रम होतील. इत्यादी संकल्प, आशीर्वाद आणि मग कर्म पूर्ण होईल.


10 वाजल्यापासून मंगल ध्वनीचा भव्य कार्यक्रम 


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीनं अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे भक्तीभावानं संपन्न होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी 10 वाजल्यापासून 'मंगल ध्वनीं'चं भव्य वादन होणार आहे. विविध राज्यातील 50 हून अधिक मनमोहक वाद्य सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार असतील. अयोध्येतील यतींद्र मिश्रा हे या भव्य मंगल वादनाचे शिल्पकार आणि आयोजक आहेत, ज्यामध्ये केंद्रीय संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांनी सहकार्य केले आहे. ट्रस्टनं म्हटलं आहे की, भगवान श्री राम यांच्या सन्मानार्थ विविध परंपरा एकत्र करून हा भव्य सोहळा प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे.


प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवसच का?


सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय. 


श्रीराम मंदिराची वैशिष्ट्य 


राम मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून गुलाबी बन्सी पहारपूरचे दगड आणले आहेत. हे मंदिर सर्वात शक्तिशाली भूकंप देखील सहजपणे सहन करण्यास सक्षम असेल. मंदिराच्या प्रत्येक बाजूला 390 खांब आणि 6 मकराना संगमरवरी खांब आहेत. त्यामध्ये 10 हजारांहून अधिक शिल्पे आणि थीम कोरण्यात आल्या आहेत. 


मे 2020 पासून मंदिराचे बांधकाम सुरू झाले. त्याच्या पायाभरणीसाठी आयआयटीसारख्या संस्थांचीही मदत घेण्यात आली. L&T चे वरिष्ठ उपाध्यक्ष एम.व्ही. सतीश म्हणाले की, या मंदिराचा प्रत्येक दगड अतिशय काळजीपूर्वक आणि उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून बसवण्यात आला आहे.


भव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज


प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सजली असून रामनगरी यावेळी भक्तिरसात तल्लीन झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येतील धरमपथ आणि रामपथ येथून भाविकांची मोठी गर्दी होत असताना, पोलीस रस्त्यावर गस्त घालताना दिसतात. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिर फुलांनी आणि विशेष दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितलं की, सजावटीसाठी फुलांचा "समृद्ध साठा" वापरण्यात आला आहे आणि 22 जानेवारी रोजी होणार्‍या सोहळ्याच्या दृष्टीने मंदिर सजवण्यासाठी फुलांचे विशेष डिझाईन तयार करण्यात आले आहे.