Raksha Bandhan 2023: यंदा 30 ऑगस्टला रक्षाबंधनची (Raksha Bandhan) तारीख दिली आहे. पण या तारखेस केवळ रात्री नऊनंतरच मुहूर्त असल्याचं सांगितलं जात आहे. कारण 30 ऑगस्टला रात्री रात्री 9.02 वाजेपर्यंत भद्राकाळ असेल आणि शास्त्रानुसार, भद्राकाळात रक्षाबंधन साजरं करू नये, असा समज आहे, कारण असं करणं अशुभ मानलं जातं.


मग आता भावाला राखी बांधावी तरी कधी?


यावेळी 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग देखील आहे, जो खूप खास मानला जातो. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होते आणि 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता पौर्णिमा संपते, त्यामुळे या दरम्यानचा वेळ हा राखी बांधण्यासाठी योग्य आहे.


परंतु 30 ऑगस्टला रात्री 9.02 वाजेपर्यंत भद्राकाळ असल्याने त्यानंतर रक्षाबंधन साजरं केलं जावू शकतं. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 मिनिटांपर्यंत भावाला राखी बांधता येईल. पण बरेच जण मानतात की, बहिणीचं भावावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो, त्यामुळे अशा दिवशी मुहूर्ताचा सोस कशाला बाळगायचा. त्यामुळे जे लोक मुहूर्ताची परवा बाळगत नाही, ते 30 ऑगस्टला कोणत्याही वेळी भावाला राखी बांधू शकतात.


रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत काय?


रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, आंघोळ करावी. चांगले कपडे घालावे आणि सूर्याला जल अर्पण करावं. त्यानंतर घरातल्या देव्हाऱ्यातील देवाचं दर्शन घ्यावं. देवाची पूजा करुन देवांसाठीही राखीचं ताट करावं. ताटात कलश, नारळ, सुपारी, चंदन, एक रुपयांचं नाणं, सोनं, अक्षता, राखी आणि मिठाई ठेवावी. ताटात तुपाचा दिवाही ठेवावा. प्रथम देवाला औक्षण करावं. पहिली राखी देवाला अर्पण करावी. देवाला राखी अर्पण करून सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवावं. यानंतर भावाला टिळा लावावा, नंतर राखी बांधून भावाला ओवाळावं. भावाला मिठाई भरवून त्याचं तोंड गोड करावं.


रक्षाबंधनाचं पौराणिक महत्त्व


भावाच्या संरक्षणासाठी मनगटावर बांधलेला धागा म्हणजे रक्षासूत्र. असं मानलं जाते की राजसूय यज्ञादरम्यान, द्रौपदीने तिच्या रेशमी कापडाचा एक तुकडा भगवान कृष्णाला रक्षासूत्र म्हणून बांधला होता. यानंतर बहिणींनी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली. तसंच, पूर्वीच्या काळी ब्राह्मण यजमानांना राखी बांधायचे आणि त्यांना शुभेच्छा द्यायचे. रक्षाबंधनाच्या दिवशी वेदपाठी ब्राह्मण यजुर्वेदाचं पठण सुरू करतात.


भारताशिवाय जगभरात जिथेही हिंदू धर्माचे लोकं राहतात तिथे बहिण-भाऊ रक्षाबंधन सण साजरा करातात. राखी हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे.


हेही वाचा:


Raksha Bandhan 2023: विविध रंगी राख्यांनी बाजार सजले; फोटोंमधून पाहा यंदाचे राखी ट्रेंड