भोपाळ : शाळा प्रशासनाकडून अनवधानाने कारमध्ये लॉक झालेल्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये गेल्या सोमवारी ही घटना घडली होती, रविवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सहा वर्षांच्या नैतिक गौरचा गाडीत गुदमरुन मृत्यू झाला. गेल्या सोमवारी (19 मार्च) जवळपास चार तास तो गाडीमध्ये लॉक्ड होता. बेशुद्धावस्थेत आढळलेल्या नैतिकला लहान मुलांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी (25 मार्च) त्याचा मृत्यू झाला.
नैतिकच्या आई-वडिलांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
'शाळेच्या संचालकांनी काही शिक्षकांसोबत नैतिकला गाडीने नेलं. मात्र शाळेत पोहचल्यावर नैतिकने गाडीतून उतरण्यास नकार दिला. यावर संचालक त्याला गाडीतच लॉक करुन निघून गेले. त्यानंतर एका शिक्षिकेला त्यांनी नैतिकला बाहेर काढण्यास सांगितलं. मात्र शिक्षिका विसरल्यामुळे नैतिक चार तास गाडीतच राहिला' असं नैतिकचे वडील सुरेंद्र गौर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.