नवी दिल्ली : गुजरात राज्यसभेची निवडणूक ही आज देशात चर्चेचा विषय बनली आहे. 2014 नंतर काँग्रेस-भाजपमधली ही सर्वात प्रतिष्ठेची लढाई म्हणता येईल. ही निवडणुक भाजप-काँग्रेसमधली दिसत असली तरी याला वैयक्तिक दुश्मनीचीही किनार आहे. कारण अहमद पटेल-अमित शहा-नरेंद्र मोदी हे या रणमैदानातले तीन प्रमुख मोहरे आहेत. या निवडणुकीत एवढं घमासान होण्यामागे या तिघांचे जुने संबंधही कारणीभूत आहेत.
अहमद पटेल आणि अमित शाह...गुजरात राज्यसभेसाठी जो बुद्धिबळाचा खेळ चालू आहे, त्यात हे दोन वजीर एकमेकांसमोर आहेत. दोघेही गुजरातमधले. एक काँग्रेसचे चाणक्य तर दुसरे भाजपचे. आमदारांशी डील करण्याचं जे कसब अहमदभाई इतकी वर्षे दाखवत आले, त्याच खेळात अमित शाहदेखील माहिर आहेत. त्यामुळेच गुजरात राज्यसभा निवडणुकीत इतका रोमांच निर्माण झाला आहे.
आकडे पाहिले तर भाजपचे दोन खासदार निवडून येतात, पण तिसरा निवडून येईल इतपत संख्याबळ भाजपकडे सुरुवातीला अजिबातच नव्हतं. वाजपेयी-अडवाणींची भाजप असती, तर कदाचित तिसरी जागा काही जमणार नाही, असं समजून अहमद पटेलांसाठी ती सोडलीही गेली असती. पण ही बदलेलली भाजप आहे आणि त्यात अमित शाह-अहमद पटेलांच्या नात्याला वैयक्तिक दुश्मनीचीही किनार आहे.
2010 ते 2012 या जवळपास दोन वर्षांच्या काळात अमित शाह हे तडीपार होते. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात कोर्टानं त्यांना हा आदेश दिला होता. सीबीआयच्या याचिकेवर. ज्या सीबीआयची चावी एका अर्थाने तेव्हा काँग्रेसच्या म्हणजे पर्यायाने अहमदभाईंच्याच हातात होती. गृहराज्यमंत्री असलेले अमित शाह हे जवळपास दोन वर्षे गुजरातमध्ये परत येण्यासाठी धडपडत होते. कोर्टाची दारंही अनेकदा ठोठावली. अगदी 2012 ची गुजरात विधानसभा निवडणुक जवळ आली तरीही अमित शाहांना परवानगी मिळत नव्हती. प्रकरण कोर्टाचं असलं तरी सीबीआयची भूमिका या सगळ्यात महत्त्वाची राहिली होती आणि ती कुणाच्या इशाऱ्यावर असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळेच जुने हिशोब चुकते करण्यासाठी अमित शहांनी ही वेळ निवडली असावी.
दुसरीकडे अहमद पटेल आणि नरेंद्र मोदी यांचे संबंधही तितकेच इंटरेस्टिंग आहेत. 2014 ची लोकसभा निवडणुक ऐन भरात असतानाच मोदींनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत अहमद पटेलांबद्दल केलेलं एक वक्तव्य गाजलेलं होतं. "अहमद पटेल हे माझे काँग्रेसमधल्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी होते. आता ते तसे राहिले नाहीत. कदाचित त्यांना आता काही अडचणी असतील, त्यामुळे ते मला टाळतात. माझा साधा फोनही ते उचलत नाहीत. पण कधी काळी मी त्यांच्या घरी जाऊन डिनर करायचो. हे नातं एका चांगल्या मैत्रीचं होतं. मला वाटतं अशी वैयक्तिक मैत्री कायम राहिली पाहिजे," असं मोदी म्हणाले होते.
मोदींच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देता देता पटेलांची तारांबळ उडाली होती. लोकसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच मोदी असं वक्तव्य करत असल्याचं पटेलांनी म्हटलं. शिवाय ते केवळ एकदाच, 80 च्या दशकात आमच्याकडे जेवायला आले होते. त्याची कल्पनाही मी राजीव गांधींना दिली होती. मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कधी त्यांना भेटायला गेलो नाही. जर त्यांच्याकडून काही मदत मागायला भेटल्याचं त्यांनी सिद्ध केलं तर राजकारण सोडून देईन अशी तिखट प्रतिक्रिया अहमद पटेल यांनी दिलेली होती.
अर्थात पटेलांशी शाहांचे संबंध जितके तणावाचे आहेत, तितके मोदींचे नाहीत ही गोष्ट खरी आहे. मात्र लोकसभेच्या प्रचारात मोदी पटेलांचा उल्लेख अहमद मियाँ असा खोचकपणे करायचे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचं नैतिक मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भाजपने अहमद पटेलांसाठी सापळा रचला हे उघड आहे. पण यानिमित्ताने अमित शाहांना अहमद पटेलांचा जुना हिशेब चुकता करायची संधी मिळणार आहे. शिवाय वार पटेलांवर असला तरी त्याचे घाव सोनिया गांधींवर बसणार आहेत. ज्यानं मोदींचाही उद्देश सफल होणार आहे. त्यामुळेच मोदी, शाह, पटेल या तीन मोहऱ्यांचे आपापसातले संबंध या निवडणुकीत राजकारणाच्या गडद छटा दाखवत आहेत.