नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात बसपा अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उमेदवारांना लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून दिला. मात्र आता अखिलेश यादव यांनी मायावतींना रिटर्न गिफ्ट देण्याची वेळ आली आहे. राज्यसभा निवडणुकीत बसपाला विजय मिळवून देणं अखिलेश यादव यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान असेल. त्यासाठी आमदारांची मनधरणी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशात 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत.

कर्नाटक

कर्नाटकमध्ये चार जागांसाठी पाच जणांनी अर्ज भरला. यामध्ये तीन काँग्रेस, एक भाजप आणि एक जेडीएसचा उमेदवार आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येकाला 44 आमदारांच्या मतांची गरज आहे. त्यानुसार भाजपचा उमेदवार सहज निवडून येईल, मात्र जेडीएस आणि काँग्रेसच्या उमेदवारासाठी पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 10 मतांची गरज आहे. तर एवढीच मतं जेडीएसलाही आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक आहेत.

झारखंड

झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपने यावेळी पुन्हा दोन उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसने जेएमएमच्या समर्थनाच्या बळावर उमेदवार दिलाय. भाजपने आदिवासी कार्ड खेळत माजी आमदार समीर ओराव यांना आणि उद्योगपती प्रदीप सोंथालिया यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने दोन वेळा राज्यसभेवर निवडून आलेले खासदार धीरज साहू यांना उमेदवारी दिली. जेएमएमने काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली. जिंकण्यासाठी एका उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. भाजपकडे स्वतःच्या 43 आमदारांव्यतिरिक्त एजेएसयूचे चार आमदार आहेत. म्हणजेच 27 शिवाय आणखी 20 मतं आहेत. तर जेएमएमकडे 18 आणि काँग्रेसचे सात आमदार आहेत, जो आकडा 27 पेक्षाही कमी होत आहे. या परिस्थितीत जेव्हीएम आणि अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. इथे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला 37 आमदारांची गरज आहे. या गणितानुसार, टीएमसीचे चार उमेदवार सहज निवडून येतील आणि त्यांच्याकडे 17 मतं शिल्लक राहतात. तर पाचवी जागा जिंकण्यासाठी डावे आणि काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांच्यात टक्कर होईल. सिंघवी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. काँग्रेसकडे 30 आमदार असून ममता बॅनर्जींचे 17 आमदार काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत.

तेलंगणा

तेलंगणामध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. इथे चार उमेदवारांनी अर्ज भरलाय, ज्यामध्ये एक काँग्रेस आणि तीन टीआरएसचे उमेदवार आहेत.

या राज्यांमध्ये बिनविरोध निवडणूक

महाराष्ट्र : भाजपच्या विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवड झाली. भाजप तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून आला. भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांची निवड झाली. तर शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर निवडून गेले.

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशात तीन जागांसाठी निवडणूक होती. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यामध्ये दोन टीडीपी आणि एक वायएसआरचा उमेदवार आहे.

बिहार : इथे सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. दोन जेडीयू, एक भाजप, दोन आरजेडी आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला.

छत्तीसगड : इथे एका जागेसाठी निवडणूक होती. भाजपचे सरोज पांडे बिनविरोध निवडून आले.

गुजरात : गुजरातमध्ये चार जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये दोन काँग्रेसचे, तर दोन भाजपचे खासदार आहेत.

हरियाणा : इथेही भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.

हिमाचल प्रदेश : इथे एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि जेपी नड्डा यांची बिनविरोध निवड झाली.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय तीन इतर उमेदवार अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी आणि राजमणी पटेल यांची बिनविरोध निवड झाली.

राजस्थान : इथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे भूपेंद्र यादव, मदनलाल सैनी आणि डॉक्टर किरोडी लाल यांची बिनविरोध निवड झाली.

देहरादून : उत्तराखंडमधील एका जागेवरही बिनविरोध निवडणूक झाली. भाजपचे अनिल बलूनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले.

ओदिशा : इथे तीन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बीजेडीचे तीन उमेदवार निवडून आले.