नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सोनिया गांधींसोबतच भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे राज्यसभेत बिनविरोध निवडून आले. सोनिया गांधी या आधी सहा वेळा लोकसभेमध्ये निवडून गेल्या आहेत. आता राज्यसभेत जाण्याची त्यांची पहिलीच वेळ आहे. 


सोनिया गांधींनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार नाही असं या आधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांच्यासोबत भाजपचे दोन उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. 


 






राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होणार होती आणि फक्त तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मंगळवारी शेवटची तारीख होती. एकाही उमेदवाराचे नाव मागे न घेतल्याने तिन्ही उमेदवार निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. 


रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार? 


गेल्या अनेक दिवसांपासून सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढणं आणि त्यासाठी प्रचार करणं प्रकृती अस्वास्थामुळे सोनिया गांधींना शक्य नसल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांनी राज्यसभेचा मार्ग निवडल्याचं सांगितलं जातंय.


त्यानंतर आता त्या राजस्थानमधून राज्यसभेवर गेल्या आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघ म्हणजे, काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर रायबरेलीतून कोण लढणार असा प्रश्न विचारला जात आहे. रायबरेलीतून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अद्याप काँग्रेसकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


रायबरेलीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. गेली अनेक दशकं या जागेवर काँग्रेसचंच वर्चस्व आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आहे. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडेच आहे. 


ही बातमी वाचा: