Rajya Sabha Election 2022 : संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील अर्थात राज्यसभेतील महिला सदस्यांची संख्या आता 32 वर पोहोचली आहे. राज्यसभेच्या 57 जागांसाठी शुक्रवारी (10 जून) निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यसभेच्या महिला सदस्यांची संख्या आता 32 झाली आहे. त्यांच्या शपथविधीनंतर राज्यसभेतील महिला प्रतिनिधीत्वाचा नवा विक्रमही प्रस्थापित होणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये राज्यसभेत सर्वाधिक 31 महिला सदस्य होत्या. वरिष्ठ सभागृहातील कार्यकाळ संपणाऱ्या  57 सदस्यांमध्ये पाच महिला सदस्यांचा समावेश होता. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अंबिका सोनी, छत्तीसगडमधून काँग्रेसच्या छाया वर्मा, मध्य प्रदेशमधून भाजपच्या समतिया उईके आणि बिहारमधून राष्ट्रीय जनता दलाच्या मीसा भारती यांचा समावेश होता.


त्यापैकी निर्मला सीतारमण आणि मीसा भारती या पुन्हा एकदा राज्यसभेत परतल्या आहेत. सीतारमण कर्नाटकमधून तर भारती बिहारमधून पुन्हा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. छाया वर्मा, उईके आणि सोनी यांना त्यांच्या पक्षांनी उमेदवारी दिलेली नव्हती. कार्यकाळ संपणाऱ्या पाच महिला सदस्यांसह सध्या राज्यसभेच्या एकूण 232 सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या 27 आहे. यामध्या 10 महिला सदस्या भाजपच्या आहेत.  सध्या राज्यसभेत सात नामनिर्देशित सदस्यांसह 13 जागा रिक्त आहेत.


निवडणूक जिंकल्यानंतर प्रथमच राज्यसभेत पोहोचलेल्या महिला सदस्यांमध्ये उत्तर प्रदेशमधून भाजपच्या संगीता यादव आणि दर्शना सिंह, झारखंडमधून झारखंड मुक्ती मोर्चाच्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा महुआ मांझी, छत्तीसगडमधून रणजीत रंजन, ओदिशामधून बिजू जनता दलाच्या सुलता देव, मध्य प्रदेशातून भाजपच्या सुमित्रा वाल्मिकी आणि कविता पाटीदार तर उत्तराखंडमधून कल्पना सैनी यांचा समावेश आहे. राज्यसभेचे उपसभापती एम व्यंकय्या नायडू यांनी 17 नोव्हेंबर 2019 रोजी वरिष्ठ सभागृहाच्या ऐतिहासिक 250 व्या अधिवेशनापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, राज्यसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व 1952 मधील 15 (6.94 टक्के) वरुन वाढले आहे. 2014 मध्ये 31 (12.76 टक्के) आणि 2019 मध्ये ते 26 (10.83 टक्के) वर गेले आहे.


निवडणूक आयोगाने अलीकडेच राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्व 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले. या उमेदवारांमध्ये सीतारमण वगळता वरील नऊ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चार राज्यांतील उर्वरित 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. महाराष्ट्रातील प्रत्येकी सहा, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी चार आणि हरियाणातील दोन जागांसाठी मतदान झालं. या जागांवर उमेदवारांची संख्या संबंधित राज्यांतील जागांपेक्षा जास्त होती. त्यामुळे मतदानाची वेळ आली. त्यात सीतारामण या एकमेव महिला उमेदवार होत्या आणि त्याही जिंकल्या.