Rajiv Gandhi Death Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरात त्यांचे स्मरण केले जात आहे. भारतरत्न राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी आत्मघातकी बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी देश स्वतंत्र झाला. मोठे झाल्यानंतर राजीव गांधी यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा राजकीय वारसाच चालवला नाही तर देशाला तंत्रज्ञान आणि जागतिक उंचीवर नेण्याचे अभूतपूर्व कार्यही केले. त्यांचे बालपण, शिक्षण, राजकीय जीवन आणि प्रेम जीवन हे सर्व मनोरंजक आठवणींनी भरलेले आहे. देशातील एका मोठ्या राजकीय आणि बलाढ्य कुटुंबात जन्म घेतल्याने राजीव यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाचा त्यांची हत्या झाली. माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मारेकरी एजी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश दिले. गेल्या 31 वर्षांपासून तो तुरुंगात होता. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टी.
पंतप्रधान म्हणून राजीव गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील शेवटचे सदस्य
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. ते तीन वर्षांचे असताना देश स्वतंत्र झाला. पंतप्रधान म्हणून राजीव गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील शेवटचे सदस्य होते. त्यांच्यानंतर गांधी कुटुंबीय राजकारणात असले तरी पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान होऊ शकले नाही. राजीव गांधींचे कुटुंब राजकारणात पूर्णपणे सक्रिय असतानाही आजोबा जवाहरलाल नेहरूंनंतर त्यांच्या आई इंदिरा गांधी याही देशाच्या पंतप्रधान होत्या. पण राजीव यांना त्यांच्या आजोबा किंवा आईप्रमाणे राजकारणात रस नव्हता. राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधी व्यावसायिक पायलट होते.
राजीव गांधींचे शिक्षण आणि कारकीर्द
त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, राजीव गांधींनी अभियांत्रिकी करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित राहणे आवडत नव्हते. प्रथम लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज आणि नंतर केंब्रिजमधून तीन वर्षे शिक्षण घेऊनही राजीव गांधींना पदवी मिळवता आली नाही. तरीही राजीव गांधींनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला, पण त्यांना तिथेही त्यांचे मन रमले नाही, यानंतर राजीव भारतात परतले आणि दिल्लीच्या फ्लाइंग क्लबमध्ये पायलटचे प्रशिक्षण घेतले. राजीव गांधी यांनी 1970 मध्ये एअर इंडियामधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
फोटोग्राफी तसेच विमान उडवण्याची आवड
फार कमी लोकांना माहित आहे की, राजीव गांधींना फोटोग्राफी तसेच विमान उडवण्याची खूप आवड होती. अनेक प्रकाशकांनी त्यांची छायाचित्रे छापण्याचा प्रयत्न केला, पण राजीव गांधींनी कधीही परवानगी दिली नाही. मात्र, राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव जगाला व्हावी यासाठी त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचा संग्रह पुस्तकाच्या स्वरूपात केला. 'राजीव्स वर्ल्ड - फोटोग्राफ्स बाय राजीव गांधी' असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे.
राजीव गांधी आणि राजकारण
राजीव गांधींची प्रतिमा नेहमीच स्वच्छ आणि निष्कलंक होती. 1980 मध्ये जेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना मिस्टर क्लीन मानले गेले. सुरुवातीपासून परदेशात शिकणाऱ्या या तरुणाने वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी राष्ट्रीय राजकारणाची उंची गाठली. मात्र, राजकारणात आल्यानंतर त्यांचे नाव अनेक मोठ्या घोटाळ्यांमध्ये आले, ज्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली. असे म्हणतात की, राजीव गांधी हे एकमेव असे पंतप्रधान होते जे स्वत: गाडी चालवत असे, एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असत. अनेक निवडणूक रॅलींमध्येही राजीव गांधी स्वतः गाडी चालवून पोहोचले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक त्यांचा पाठलाग करायचे.
राजीव यांचे राजकारणात प्रवेश करण्याचे कारण म्हणजे..
इंदिरा गांधींसोबत त्यांचा मुलगा संजय गांधी यांनी त्यांचा राजकीय वारसा सांभाळला. तोपर्यंत राजीव यांनी राजकारणात येण्याचा क्वचितच विचार केला असेल, पण संजय गांधींचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्या काळात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना भेटायला लोक यायचे. एके दिवशी बद्रीनाथ धामचे जगतगुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद जी इंदिरा गांधींना भेटले आणि त्यांना सावध केले की राजीवने जास्त काळ विमान उडवू नये. राजीव यांनी आता देशसेवेत सहभागी व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हापासून राजीव राजकारणात सक्रिय झाले होते.