Rajiv Gandhi Birth Anniversary : देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान आणि डिजिटल क्रांतीचे जनक समजल्या जाणाऱ्या राजीव गांधींची आज जन्मतिथी साजरी केली जात आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. राजीव गांधींच्या आजींच्या नावावरुन त्यांचं नाव राजीव असं ठेवण्यात आलं. राजीव गांधींनी 1984 ते 1989 या काळात पंतप्रधान म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे आजच्या भारताच्या विकासाची पायाभरणी झाल्याचं दिसून येतंय.  


देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नातू आणि इंदिरा गांधी यांचे पुत्र असलेल्या राजीव गांधींनी ब्रिटनमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं. 1966 साली ते पायलट बनले. राजकारणात यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. पण संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर, 1980 साली त्यांना नाईलाजास्तव राजकारणात यावं लागलं. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1984 साली लोकसभेच्या तीन-चतुर्थांश जागा जिंकल्या होत्या. राजीव गांधींनी वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते.


राजीव  गांधी यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय


प्रौढ मतदानाची वयोमर्यादा 18 वर आणली
या आधी देशात मतदानासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक होतं. ही अट राजीव गांधींनी 18 वर आणली आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत अधिक युवकांना सामिल करुन घेतलं.  


डिजिटल क्रांतीचा पाया
आपला देश आज जी प्रगती करतोय किंवा देशात जी डिजिटल क्रांती झाली आहे त्याची पायाभरणी राजीव गांधीनी केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय देशाची प्रगती होणं शक्यच नाही असं त्यांचं मत होतं. देशात संगणकाची सुरुवात करण्याचा मान राजीव गांधींना जातोय.


पंचायतीराज व्यवस्थेचा पाया
राजीव गांधींनी आपल्या देशात तळागाळापर्यंत लोकशाही मुरण्यासाठी पंचायती राज व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकालातच पंचायत राज व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला होता. पण दुदैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाला. पुढच्या सरकारने म्हणजे पंतप्रधान नरसिंह रावांनी 1992 मध्ये 73 आणि 74 वी घटनादुरुस्ती विधेयक पारित केलं आणि  24 एप्रिल 1993 पासून संपूर्ण देशात पंचायती राज व्यवस्था लागू केली. 


जवाहर नवोदय विद्यालय योजनेची सुरुवात 
ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं म्हणून राजीव गांधींनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालयाची स्थापना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची सुविधा मिळते.


राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा
राजीव गांधी सरकारने 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण (NPE) ची घोषणा केली. या धोरणांतर्गत पूर्ण देशात उच्च शिक्षण व्यवस्थेचं आधुनिकीकरण आणि विस्तार झाला.


दूरसंचार क्रांती
संगणक क्रांतीसोबतच देशात दूरसंचार क्रांती घडवून आणण्याचं श्रेय देखील राजीव गांधींना जातं. राजीव गांधी यांच्या पुढाकाराने ऑगस्ट 1984 मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) ची स्थापना झाली. या अंतर्गत शहरापासून गावांपर्यंत दूरसंचाराचं जाळं टाकण्याचं काम सुरु झालं. जागोजागी पीसीओ सुरु झाले. गावखेड्यातील जनता दूरसंचार क्रांतीमुळं शहरं आणि जगाशी जुळू शकली. त्यानंतर 1986 मध्ये राजीव गांधी यांनी एमटीएनएलची स्थापना केली.


पुढे 21 मे 1991 रोजी तामिळनाडूत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लिट्टे या श्रीलंकेतील दहशतवादी गटाने मानवी बॉम्बचा वापर करुन राजीव गांधींची हत्या केली.  


महत्वाच्या बातम्या :