नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या विधवांनी केलेल्या आंदोलनावरुन आता राजस्थानचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. या मुद्द्यावरुन राजस्थान सरकार आणि भाजपमधील संघर्ष वाढत चालला आहे. अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात 10 दिवस निदर्शने करणाऱ्या तीन शहीदांच्या पत्नींना जयपूर पोलिसांनी आंदोलनस्थळावरुन हटवले असून त्यांना पाठिंबा देणारे भाजप खासदार किरोरी लाल मीणा यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 2019 च्या पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या तीन जवानांच्या विधवा पत्नींनी 28 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु केलं आहे. अनुकंपा तत्वावर त्यांच्या नातेवाईकांसोबतच त्यांच्या मुलांनाही नोकऱ्या मिळाव्यात आणि इतर काही मागण्या त्यांनी केल्या आहेत.
या घटनेनंतर राज्यातील भाजपने आक्रमक भूमिका घेत गेहलोत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या वतीनं शनिवारी मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. जयपूरमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या घराबाहेर निदर्शने करत असताना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांच्या पत्नींना पोलिसांनी त्या ठिकाणावरुन हटवलं आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. यावर भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून शहिदांचा हा अपमान असल्याचं सांगितलं आहे.
सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला घरचा आहेर
पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, विधवांचे प्रश्न संवेदनशीलतेने ऐकले पाहिजेत. रस्ते बांधणे, घरे बांधणे, पुतळे बसवणे यासारख्या मागण्या आपण पूर्ण करू शकतो, यावर आजही माझा विश्वास आहे. शहिदांच्या विधवांच्या मागण्या ऐकायला आपण तयार नाही, असा संदेश जाऊ नये. त्यांचे मुद्दे आपल्याला मान्य असो वा नसो, पण त्यांच्या मागण्या ऐकताना आपण आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे.
अशोक गेहलोत यांचा खासदार मीनावर आरोप
या विधवा 28 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहेत आणि शहीदांच्या नातेवाईकांसोबत त्यांच्या मुलांनाही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी नियमात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये त्यांच्या गावात रस्ते बांधणे आणि हुतात्म्यांचे पुतळे बसवणे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मीना यांच्यावर राजकीय फायद्यासाठी या गोष्टीचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे खासदार मीना यांनी केला आहे.