Rajasthan Congress News : राजस्थानमध्ये (Rajasthan) पुन्हा एकदा काँग्रेसमधील (congress) अंतर्गत कलह वाढत असल्याचे दिसत आहे. राजस्थानचे दोन दिग्गद नेते मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) हे सातत्यानं ऐकमेकांविरुद्ध वक्तव्य करत आहेत. सचिन पायलट हे गद्दार असल्याचं वक्तव्य अशोक गेहलोत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सचिन पायलट यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. गेहलोत यांनी बालिश वक्तव्य टाळण्याचा सल्ला पायलट यांनी दिला आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये येण्यापूर्वीच या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष वाढलेला दिसत आहेत. जाणून घेऊयात या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी..


अशोक गेहलोतांचे आरोप


1)  राजस्थानमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यापासून गेहलोत आणि पायलट यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर टीका करणे यात नवीन काही नाही. गेहलोत यांनी यापूर्वीही अनेकवेळा सचिन पायलटवर जोरदार टीका केली आहे. 


2) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस आमदार सचिन पायलट यांना गद्दार म्हटलं आहे. गद्दार कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही. काँग्रेस हायकमांड सचिन पायलटला मुख्यमंत्री करू शकत नाहीत. त्यांनी पक्षाची फसवणूक केली आहे, विश्वासघात केल्याचं वक्तव्य गेहलोत यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केलं. पायलट यांना आमदार कधीही स्वीकारणार नाहीत. ते मुख्यमंत्री कसे होऊ शकतील? अशा व्यक्तीला आमदार मुख्यमंत्री कसे स्वीकारणार? असे सवाल गेहलोत यांनी उपस्थित केले आहेत.


3) मुख्यमंत्री गेहलोत इथेच थांबले नाहीत, त्यांनी सचिन पायलटवर भाजपशी संगनमताने आपलेच सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. 2020 मध्ये जे घडले ते यापूर्वी कधीच घडले नव्हते असे ते म्हणाले. एका पक्षाच्या अध्यक्षानेच राज्यातील त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे गेहलोत म्हणाले. सचिन पायलट यांनी त्यानंतर भाजप नेते अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. काँग्रेसविरोधात बंड करण्यासाठी भाजपच्या दिल्ली कार्यालयातून पैसे आले होते. पायलटसह प्रत्येक आमदाराला प्रत्येकी 10 कोटी रुपये दिल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा गेहलोत यांनी केला आहे.


4) 2020 मध्ये सचिन पायलट अनेक आमदारांसह दिल्लीजवळील गुरुग्राममधील हॉटेलमध्ये थांबले होते. पायलट यांनी एकतर त्यांना मुख्यमंत्री करा, अन्यथा पक्ष सोडू, असे थेट आव्हान काँग्रेसला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, नंतर काँग्रेस आणि सचिन पायलट यांच्यात समेट झाला. यानंतर पायलट यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्यात आले होते.


सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर


5) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्यावर सचिन पायलट यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक गेहलोत यांचे सर्व आरोप निराधार आहेत. यापूर्वीही अशोक गेहलोत यांनी मला गद्दार म्हटले आहे. ते अनुभवी नेते आहेत. माझ्यावर खोटे, बिनबुडाचे आरोप करण्याचा सल्ला त्यांना कोण देत आहे हे मला माहीत नाही. त्यांनी अशी बालिश वक्तव्य करू नयेत असे पायलट यांनी म्हटलं आहे.


6) गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा पराभव झाल्याचा संदर्भही यावेळी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिला. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दोनदा पराबव झाल्याचे पायलट म्हणाले. दरम्यान, आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे असेही पायलट म्हणाले.


7) मी राजस्थान काँग्रेसचा अध्यक्ष असताना भाजपचा पराभव झाला होता. तरीही, काँग्रेस अध्यक्षांनी गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदाची आणखी एक संधी दिल्याचे पायलट म्हणाले. राजस्थानची निवडणूक पुन्हा कशी जिंकता येईल याला आज प्राधान्य असायला हवं असेही पायलट म्हणाले.


8) सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. आपण सर्वांनी मिळून ही यात्रा यशस्वी करण्याची गरज असल्याचे पायलट म्हणाले. भाजपला आव्हान देणारा एकमेव पक्ष काँग्रेस आहे. सर्व सत्ताधारी राज्यांमध्ये भाजपला आव्हान देण्याची गरज असल्याचे पायलट म्हणाले. सध्या राहुल गांधींसोबत पायलटही प्रवास करत आहेत. ही यात्रा सध्या मध्य प्रदेशातून जात आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान गुरुवारी सचिन पायलट यांचा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला आहे.


9) राजस्थानमधील या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या वादात काँग्रेसने उडी घेतली. दोन्ही नेत्यांमधील मतभेद मिटवून पक्ष मजबूत होईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले. भारत जोडो यात्रा यशस्वी होण्याकडे लक्ष द्यावं, असेही काँग्रेसनं म्हटलं आहे.


10) अशोक गेहलोत हे अनुभवी नेते आहेत. त्यांचे सचिन पायलट यांच्याशी असलेले मतभेद मिटवले जातील असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जयराम रमेश यांनी केलं. उत्तर भारतातील राज्यांमध्ये भारत जोडो यात्रा अधिक प्रभावी करणे ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे रमेश म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Rajasthan News : सचिन पायलट हेच पुढचे मुख्यमंत्री, गेहलोत मंत्रीमंडळातील मंत्र्याचा दावा, राजकीय चर्चांना उधाण