Rajasthan Politics : राजस्थानच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या अशोक गेलहोत ( Ashok Gelhot) हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. अशातच आता त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री राजेंद्र गुढा (Rajendra Gudha)  यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) हेच राजस्थानचे पुढचे मुख्यमंत्री (Next Chief Minister) असतील असा दावा राजेंद्र गुढा यांनी केलाय. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काल (17 ऑक्टोबर) झालेल्या मतदानानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


नेमकं का म्हणाले राजेंद्र गुढा 


राजेंद्र गुढा हे अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री आहेत. मात्र, यावेळी ते सचिन पायलट यांचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांच्या वयात मुख्यमंत्री झाले असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळं सचिन पायलट हेच राजस्थानचे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा गुढा यांनी केलाय. परसराम मदेरणा यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची मर्जी राखून अशोक गेहलोत मुख्यमंत्री बनल्याचे गुढा यावेळी म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर राजेंद्र गुडा यांनी मोठ्या राजकीय पेचप्रसंगाचे संकेत दिले आहेत. हायकमांडची अवज्ञा करणारे अनेक नेते आता माफी मागताना दिसत आहेत. चीफ व्हिप महेश जोशी, यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनीही हायकमांडची लेखी माफी मागितली आहे. माजी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या वक्तव्यावर गुढा यांनी म्हटले आहे की, मी स्वतः जोधपूरला जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे. 


काय म्हणाले होते अशोक गेहलोत


काँग्रेस अध्यक्षपदाच्या मतदानासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोहोचले होते. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षावर संकटाची वेळ आली आहे. तरुणांनी मेहनत करावी. मेहनत केली की त्यांचा सुगंध आपोआप पसरतो. अशा लोकांची पक्षात विश्वासार्हता वाढते, पक्षात मान-सन्मान मिळतो. नेतृत्वाची संधी आली की पक्ष त्यांना संधी देतो असे गेहलोत यांनी म्हटलं होतं. तसेच अनुभव नेहमीच मोठा असतो असेही ते म्हणाले होते.


सचिन पायलट यांचे कौतुक


मंत्री राजेंद्र गुढा पायलट गटातील मानले जातात. त्यामुळेच अनेक वेळेला ते सचिन पायलट यांचे खुलेपणाने कौतुक करायलाही कमी पडत नाहीत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर सचिन पायलट काँग्रेस पक्षात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे गुढा म्हणाले. सचिन पायलट यांच्या पाठीशी मी पर्वतासारखा उभा आहे, आणि उभा राहीन, असे गुढा म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


'गेहलोत कॅम्पचे 65 आमदार पायलट यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही', गेहलोत घेणार पक्ष प्रभारींची भेट