मुंबई : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 18 ऑक्टोबर या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरलेला चंदन आणि हस्तिदंताची तस्करी करणारा कुख्यात तस्कर वीरप्पन 18 ऑक्टोबर 2004 रोजी चकमकीत ठार झाला होता. वीरप्पन जवळपास दोन दशकांपासून सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरला होता. शेकडो हत्तींना मारून कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची तस्करी करणाऱ्या वीरप्पनने दीडशेहून अधिक लोकांची हत्या केली होती. यातील निम्म्याहून अधिक पोलीस होते. त्याला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी देशातील अनेक राज्यांचे पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगलात शोध घेत होते. आजच्याच दिवशी सुरक्षा दलांनी त्याला ठार केलं होत. आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर 1950 रोजी अंबाला अंबाला, पंजाब (आता हरियाणा) येथे अभिनेता ओम पुरी यांचा जन्म झाला. ओम पुरी हे हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी ब्रिटिश आणि अमेरिकन सिनेमांमध्येही योगदान दिले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. अमरीश पुरी, नसरूद्दीन शहा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर त्यांनी अनेक कलात्मक चित्रपटात काम केले. त्यांनी 1980 मध्ये आलेल्या भवानी भवई, 1981 मधील सद्गती, 1928 मध्ये अर्धसत्य, 1968 मध्ये मिर्च मसाला आणि 1992 मध्ये आलेल्या धारावी चित्रपटात त्यांनी उत्कृष्ठ काम केले होते.
1871: चार्ल्स बॅबेज यांची पुण्यतिथी, ते पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक होते
1820 मध्ये चार्ल्स बॅबेजने ज्या तत्वावर यांत्रिक गणकयंत्र आणि डिफरन्स इंजिनची रचना आणि निर्मिती केली होती. त्याच तत्वावरून आधुनिक इलेक्ट्रॉनिक संगणकाची कल्पना केली गेली आहे. बॅबेजने मांडलेली संकल्पना अखेरीस अभियंत्यांनी पहिल्या कॉम्प्युटर प्रोटोटाइपच्या विकासासाठी वापरली. यामुळे चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते.
1925: नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक इब्राहीम अलकाजी यांचा जन्मदिन
इब्राहीम अलकाजी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 रोजी पुण्यात झाला. ते भारतीय रंगभूमीचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. इब्राहीम अलकाजी यांनी त्यांच्या हयातीत अभिनेत्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. या कलाकारांमध्ये नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांची नावे आहेत. इब्राहीम अलकाजी यांनी दिग्दर्शित केलेल्या काही प्रमुख नाटकांमध्ये 'तुघलक' (गिरीश कर्नाड), 'आषाढ का एक दिन' (मोहन राकेश), धरमवीर भारतीचे 'अंधा युग' याशिवाय अनेक ग्रीक शोकांतिका आणि शेक्सपियरच्या कामांचा समावेश आहे. इब्राहीम अलकाजी यांना पद्मविभूषण (2010), पद्मभूषण (1991) आणि पद्मश्री (1966) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1931: थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी
महान अमेरिकन शोधक आणि उद्योगपती थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला. त्यांचं निधन 18 ऑक्टोबर 1931 रोजी झालं. त्याच्या नावावर 1,093 पेटंट आहेत. त्यांचा इलेक्ट्रिक बल्बचा शोध हा त्यांचा सर्वात मोठा शोध मानला जातो.
1951: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांची पुण्यतिथी
हिराबाई पेडणेकर या पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार होत्या. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1886 रोजी सावंतवाडीमध्ये संगीत, नृत्याची जाण असणार्या घराण्यामध्ये झाला. त्यांचं निधन 18 ऑक्टोबर 1951 रोजी झालं. हिराबाईंनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘जयद्रथ विडंबन’ (1904) व ‘संगीत दामिनी’ (1912) या नाटकांचा विशेष गाजली होती.
1983: विजय मांजरेकर यांचा जन्मदिवस
विजय मांजरेकर हे माजी भारतीय क्रिकेटपटू होते. 1951-52 ते 1965 पर्यंत त्यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी क्रिकेट खेळले. ते माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे वडील आहेत. संजय मांजरेकर यांनी भारतासाठी 37 कसोटी आणि 74 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले. विजय मांजरेकर हे प्रामुख्याने उजव्या हाताचा फलंदाज होते. त्यांनी 55 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यांनी 3208 धावा केल्या.