नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य यांना गळाला लावत भाजपनं काँग्रेसची सत्ता हिसकावली. आता राजस्थानमध्येही ते होणार का अशी चर्चा सुरु झालीय. कारण सचिन पायलट हे सरकारमध्ये अधिकार मिळत नसल्यानं नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दिल्लीत सध्या याबाबत वेगवान घडामोडी सुरु आहेत. सचिन पायलट हे ज्योतिरादित्य यांच्या वाटेवर आहेत का? अशी जोरदार चर्चा सुरु आहे. कारण मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट हा संघर्ष सध्या टोकाला पोहचल्याचं दिसतंय.


सचिन पायलट गटाचे 16 आमदार दिल्लीत दाखल झाल्याचं समजतंय. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून सचिन पायलट चुप्पी साधून आहेत. ना कुठलं ट्वीट, ना कुठलं वक्तव्य, ना कुणाचे फोन उचलतायत. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. कालच अशोक गहलोत यांनी भाजप आमदारांना 20-25 कोटींचं लालच दाखवत असल्याचा आरोप केला होता.


या नाराजीच्या दरम्यानच आता सचिन पायलट गटाचे आमदार हे दिल्लीत पोहचलेत. त्यामुळे काँग्रेस हायकमांडला या दोन्ही नेत्यांची समजूत काढण्यात यश येतं का पाहणं महत्वाचं असेल. पायलट हे ज्योतिरादित्य यांच्या वाटेवर असल्याच्या चर्चांमुळे आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही पक्षाला सावधगिरीचा सल्ला देत आहेत.


अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट संघर्ष आजचा नाही. डिसेंबर 2018 मध्ये राजस्थानात काँग्रेसचं सरकार आलं, त्याच्या आधीपासूनच हे वाद सुरु होते. अगदी तिकीट वाटपातूनच त्याची झलक दिसू लागली होती. नंतर मुख्यमंत्रीपदावरुनही रस्सीखेच सुरु होती. सरकार स्थापन झाल्यानंतरही कुरबुरी सुरुच राहिल्या. गहलोतांकडे मुख्यमंत्रीपद, सचिन पायलट यांच्याकडे उपमुख्यमत्री आणि प्रदेशाध्यक्षपद अशी रचना करण्यात आली. पण तरीही अधिकारांची लढाई सुरुच राहिली.


सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा केवळ काँग्रेसचा अंतर्गत वाद आहे की भाजपनं पायलट यांना गळाला लावलंय. कारण काँग्रेस महासचिव वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार प्रकरण पुढे गेलं आहे. अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्या भाजप नेत्यांसोबत संपर्काचे काही पुरावेही हायकमांडला दिल्याची चर्चा आहे. ज्योतिरादित्य यांच्या मनधरणीमध्ये काँग्रेस हायकमांडने फारसा रस दाखवला नव्हता. शेवटी ज्योतिरादित्य आपल्या आमदारांना घेऊन बाहेर पडले. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार पडलं. आता सचिन पायलट यांच्याबाबतीत कांग्रेस हायकमांड कशी पावलं टाकतं हे पाहावं लागेल. कारण इथेही सरकार जाण्याचा धोका आहे.


राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत आहे. विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसकडे 107 तर भाजपकडे 72 जागा आहेत
काँग्रेसला काही अपक्ष आणि छोट्या पक्षांचीही साथ आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये भाजपनं काँग्रेसची सत्ता खेचून घेण्यात यश मिळवलं. आता राजस्थानमध्ये काय होतंय हे पुढच्या काही दिवसांत कळेल. सचिन पायलट यांना दिल्लीतून समजवण्यात यश येतं की ज्येष्ठांकडून होणाऱ्या कुचंबणेमुळे तेही ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणे बंडाचा झेंडा उभारणार हे पाहावं लागेल.