Rajasthan CM Rumour: राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मौन सोडले आहे. अशोक गेहलोत यांनी ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. जयपूर येथे एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मला अशा अफवा सतत ऐकायला मिळत आहेत. सरकार बदलत आहे, मुख्यमंत्री बदलत आहेत, सतत अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असतात असे गेहलोत म्हणाले. तसेच माझा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पडून आहे, त्यांना हव्या तेव्हा ते माझा राजीनामा घेतील असेही गेहलोत यावेळी म्हणाले.


गेल्या काही दिवसापासून राजस्थानमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावर गेहलोत यांनी प्रतिक्रिया देताना या सर्व अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझा राजीनामा काँग्रेसच्या स्थायी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पडून आहे, त्या त्यांना हव्या तेव्हा माझा राजीनामा घेतील असे गेलहोत यांनी म्हटल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी सचिन पायलट यांची सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.  त्यानंतर राजस्थानमध्ये अचानक मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गेहलोत यांचे हे विधान त्याच पार्श्‍वभूमीवर समोर आले असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.
 
राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलते


दरम्यान, सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सचिन पायलट म्हणाले होते की, राजस्थान हे असे राज्य आहे की, जिथे दर पाच वर्षांनी सरकार बदलते. पण जर आपण यापूर्वी जी पावले उचलली आहेत तशीच आणि योग्य दिशेने पावले उचलली तर आम्ही पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकू शकतो. सचिन पायलटच्या या वक्तव्यानंतरच राजस्थानमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, सचिन पायलटने यापूर्वी गेहलोत यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. पण पक्षाच्या हायकमांडने त्यांना पटवून दिले होते. मात्र, पायलट यांच्या जवळच्या सुत्रांनी दावा केला की, पायलट यांना शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 एप्रिलला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.