नवी दिल्ली : राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारवरील अनिश्चिततेचं संकट असताना, भाजपने वेट अॅण्ड वॉचची भूमिका स्वीकारली आहे. पक्षाच्या सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पुढील कारवाईच्या योजनेवर निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील शक्तिप्रदर्शनच्या परिणामाची भाजप प्रतीक्षा करणार आहे.


आज म्हणजे सोमवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी साडेदहा वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. विशेष म्हणजे या बैठकीला दिल्लीहून निरीक्षकही येणार आहेत.


Sachin Pilot | राजस्थानात सचिन पायलट यांच्या नाराजीनंतर आज विधीमंडळ पक्षाची बैठक


भाष्य करण्यास भाजपचा नकार
अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना किती आमदारांचं समर्थन आहे हे या बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट भाजपच्या काही नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. परंतु भाजपच्या सूत्रांनी यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला आहे. आमची सचिन पायलट यांच्याशी कोणतीही बातचीत झाली नसल्याचं भाजपने म्हटलं आहे.


सचिन पायलट सध्या दिल्लीत आहे आणि त्यांना जाहीरपणे काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडे 30 आमदार आणि काही अपक्ष आमदारांचं समर्थन असल्याचा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. तर भाजपच्या एका नेत्याने म्हटलं आहे की, "सचिन पायलट यांनी मनाची पूर्ण तयारी केली असून ते गहलोत यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास तयार नाहीत, असं वाटतं.


Rajasthan Political Crisis | अशोक गेहलोत सरकार अल्पमतात, 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा सचिन पायलट यांचा दावा


राजस्थान विधानसभेतील पक्षीय बलाबल
राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. बहुमतासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. तर भाजपकडे 72, इतर आणि अपक्षांचे 21 आमदार आहेत.


राजकीय नाट्यात ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांची एन्ट्री
या राजकीय नाट्यात आधी काँग्रेसवासी असलेले ज्‍योतिरादित्‍य शिंदे यांनीही एन्ट्री केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी सचिन पायलट यांची नाराजी योग्य असल्याचं सांगत काँग्रेसमध्ये टॅलेंटची कदर होत नसल्याचा आरोप केला. आपल्या जुन्या सहकाऱ्याला आठवत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, "सचिन पायलट यांनाही राजस्‍थानच्या मुख्यमंत्र्यांनी बाजूला केल्याचं आणि त्रास दिल्याचं पाहून मी दु:खी आहे. यावरुन स्पष्ट आहे की काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि क्षमतेची कदर होत नाही.