Rajasthan Chief Minister and Deputy Chief Minister :  पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवल्यानंतर भाजपने दोन उपमुख्यमंत्रिपदाची निवड केली आहे. मध्य प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री भाजपने निवडले आहेत. दिया कुमारी (Diya Kumari) आणि प्रेम चंद बैरवा (Prem chand Bairwa) हे उपमुख्यमंत्री (Rajasthan Deputy Chief Minister ) असणार आहेत. तर, नव्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी वासूदेव देवनानी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. भाजपला राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यास देवनानी यांचा विजय स्पष्ट  आहे.  


भाजपच्या विधिमंडळ गटाची आज बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठीची नावे जाहीर करण्यात आली. दिया कुमारी या जयपूरचे शेवटचे शासक महाराजा मानसिंग द्वितीय यांच्या नात आहे. 2019 मध्ये दिया कुमारी खासदार होत्या. नंतर पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. राजकुमारी दिया कुमारी या विद्याधरनगर या मतदारसंघातून 71 हजार 368 मतांनी विजयी झाल्या आहेत.


प्रेमचंद बैरवा हे दुडू येथून भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यांनी ही निवडणूक 35743 मतांच्या फरकाने जिंकली आहे. निवडणुकीत त्यांनी बाबूलाल नगर यांचा पराभव केला आहे. त्यांनी 1995 मध्ये ब्लॉक संघटनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. वासुदेव देवनानी हे अजमेर उत्तरमधून भाजपचे आमदार निवडून आले आहेत.


राजस्थानमध्ये भाजपचा धमाका


राजस्थानमध्येही भाजपने अनेकांना धक्का देत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची माळ भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात टाकली. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 


भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.



राजस्थान पक्षीय बलाबल (Rajasthan Result 2023)



भाजप - 115
काँग्रेस - 69
भारत आदिवासी पक्ष - 3
बसपा - 2
राष्ट्रीय लोक दल - 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी -1
अपक्ष - 8 
---------------------
एकूण -199