Rajasthan Cabinet Expansion :राजस्थानमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) माजी मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी करनपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक रिंगणात असतानाही मंत्रिमंडळात समाविष्ट केलं आहे. या जागेसाठी 5 जानेवारीला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये शनिवारी (30 डिसेंबर) 22 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.


मंत्रिपदाला काँग्रेसचा विरोध


सुरेंद्रपाल सिंह टीटी यांच्या मंत्रीपदी नियुक्तीवर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा म्हणाले की, "पक्ष ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी करेल." दोतासरा यांनी म्हटले आहे की, "देशातील कदाचित ही पहिलीच घटना असेल जेव्हा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या उमेदवाराला मंत्री केले असेल, काँग्रेस ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून कारवाईची मागणी करेल." भाजप मतदारांना भुरळ घालू शकते, परंतु काँग्रेस पक्ष करणपूरची जागा मोठ्या फरकाने जिंकेल.


राजस्थान मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजधानी जयपूरमधील राजभवनात पार पडला. यादरम्यान 12 आमदारांनी कॅबिनेट मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राजभवनात आमदार आणि सुरेंद्रपाल सिंह टीटी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुरेंद्रपाल सिंह टीटी यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत सुरेंद्रपाल सिंह हे टीटी करनपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. उमेदवाराच्या मृत्यूनंतर या जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.


काँग्रेस उमेदवाराच्या मृत्यूनंतर निवडणूक पुढे ढकलली


राज्यातील विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्याचा निकाल 3 डिसेंबरला लागला. करणपूर गंगानगर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या जागेसाठी आता 5 जानेवारीला मतदान होणार आहे. 8 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.


विधानसभेत भाजप-काँग्रेसची स्थिती


भाजपकडून माजी मंत्री सुरेंद्रपाल हे उमेदवार आहेत, तर काँग्रेसने कुन्नर यांचे पुत्र रुपिंदर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. करणपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 249 मतदान केंद्रे आहेत. 6 डिसेंबरपर्यंत येथे 2 लाख 40 हजार 826 मतदार होते. सध्या विधानसभेत भाजपचे 115 तर काँग्रेसचे 69 आमदार आहेत. भजनलाल शर्मा यांनी 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.


इतर महत्वाच्या बातम्या