India vs China : आपल्या खाण्यापिण्यात रोज वापरला जाणारा 'लसूण' दोन देशांमधील नव्या 'युद्ध'ला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. इथं आपण दारु-गोळ्यानं लढलेल्या युद्धाबद्दल बोलत नाही. तर लसणाच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. भारताची लसूण निर्यात सातत्यानं वाढत आहे. त्यामुळं आता चीनच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 


जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करत नाही. पण भारत आता या आघाडीवरही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सातत्याने वाढत आहे. ज्यामुळं चीनच्या अडचणी वाढत आहेत. दरम्यान, चीनने ब्लीच केलेला लसूणही टाकण्यास सुरुवात केली आहे.सध्या लसणाच्या निर्यातीत चीन अजूनही जगात आघाडीवर आहे यात शंका नाही. एकेकाळी चीनने जगातील 80 टक्के लसणाची निर्यात केली होती. जी आता अलिकडच्या वर्षांत 70 ते 75 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, भारताच्या लसूण निर्यातीत वाढ झाली आहे.


भारताची लसूण निर्यात


मसाल्यांच्या व्यापारात भारत हा जगातील एक आघाडीचा देश आहे. प्राचीन मसाल्यांचा व्यापार मार्ग भारतातून जात असे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारताच्या मसाल्यांच्या निर्यातीत लसणाचा वाटा झपाट्याने वाढला आहे. स्पाइस बोर्डाच्या आकडेवारीनुसार, 2022 ते 23 च्या एप्रिल ते जानेवारी या अवघ्या 10 महिन्यांत लसणाच्या निर्यातीत 165 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत भारताने 47,329 टन लसणाची निर्यात केली. तर संपूर्ण आर्थिक वर्षात ही निर्यात 57346 टन होती, जी 2021-22 च्या तुलनेत 159 टक्के अधिक होती. 2023-24 ची आकडेवारी अजून येणे बाकी आहे. याउलट, चीनच्या लसूण उत्पादनात 25 टक्क्यांपर्यंत घट नोंदवली गेली आहे. भारतीय लसूण पश्चिम आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.


भारतात 32 लाख टन लसूण पिकतो


भारतात सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. मात्र, चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते, जरी दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो.


जागतिक बाजारात भारताच्या लसणाचे दर काय?


भारतातील लसूण आकाराने चीनच्या लसूणपेक्षा किंचित लहान आहे. त्याच वेळी, त्याचा दर चीनपेक्षा खूपच कमी आहे. जागतिक बाजारपेठेत चिनी लसणाची किंमत 1250 डॉलर प्रति टन आहे, तर भारतीय लसणाची किंमत 450 ते 1000 डॉलर प्रति टन आहे. त्यामुळे भारत गरीब ते श्रीमंत देशांच्या गरजेनुसार लसणाचा दर्जा देण्यास सक्षम आहे. चिनी लसणाची मागणी बहुतांशी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आहे, तर भारत मलेशिया, थायलंड, नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर लसूण निर्यात करतो.


देशांतर्गत शेतकर्‍यांचे संरक्षण करण्यासाठी भारत दीर्घकाळापासून चिनी लसूण आयात करत नाही. त्याचवेळी चीन अनेकदा नेपाळ आणि बांगलादेशमार्गे लसणाची विक्री करतो. भारत या दोन्ही देशांसोबत लसणाचा ड्युटी फ्री व्यापार करतो. भारतात पोहोचणारा चिनी लसूण अनेक जीवाणू आणि रोग घेऊन येतो. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. अलीकडेच, एका व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की चीनमध्ये 'गटाराच्या पाण्यात' लसूण पिकवले जातो. ते पांढरे दिसण्यासाठी कृत्रिमरीत्या 'ब्लीच' केले जाते.


महत्त्वाच्या बातम्या:


China Birth Rate : चीनसमोर नवं संकट! मुले जन्माला घालण्यास घाबरतायत महिला; शी जिनपिंग यांच्या वक्तव्यानेही वेधलं लक्ष