Odisha Train Accident: ओदिशामधील (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी (2 जून) रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 233 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु असून ओदिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पाहणी देखील केली आहे. घटनास्थळी जाऊन रेल्वेमंत्र्यांनी ज्या रेल्वे बोगींचा अपघात झाला त्यांची पाहणी केली. तसेच त्यांनी बचावकार्यचा देखील यावेळी आढावा घेतला आणि तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली परंतु माध्यमांच्या प्रश्नांना रेल्वेमंत्र्यांनी फारशी उत्तरं न देणं यावेळी पसंत केलं.
माध्यमांशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देणं टाळलं असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. काही प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी इतकंच म्हटलं की, "ते याबाबत अधिक पाहणी करतील आणि त्यांचे अधिकारी योग्य ती चौकशी करत आहेत." तसेच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं यावेळी रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं, तर राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणं पसंत केल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले रेल्वेमंत्री?
'अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभो', अशी प्रार्थना रेल्वेमंत्र्यांनी केली. ही खूप मोठी दुर्घटना असल्याचं यावेळी अश्विन वैष्णव यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, "इथे रेल्वेच्या प्रत्येक विभागीची टीम उपस्थित आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी योग्य ती पाहणी करण्यात येत आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीला या अपघातात गमावले आहे त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमी झालेल्या लोकांसाठी जिथे कुठे चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येतील." यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचं देखील रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
"आम्ही या अपघाताच्या मुळाशी जाऊन संपूर्ण घटनेची तपासणी करु, परंतु सध्या बचावकार्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे," असं रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं. घटनास्थळी सध्या रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य करण्यात येत आहे. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जे लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत त्यांनी दोन लाखांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.
ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी केली घटनास्थळाची पाहणी
ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी घटनास्थळी पोहोचत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांशी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून संपूर्ण घटनेची पाहणी केली. या रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 900 पेक्षा अधिक लोक या अपघातात जखमी झाली आहेत.