मनुष्याच्या जाणि‍वेचे स्वरूपच असे आहे की, सध्या तो ज्या गोष्टींमध्ये गुंतला आहे, फक्त तेच त्याच्या अनुभवामध्ये सत्य असतं. आता बरेचसे लोक पाच ज्ञानेन्द्रियांमध्ये गुंतले आहेत आणि त्यांच्यासाठी फक्त तेच सत्य असते, दुसरे काही नाही. केवळ जे भौतिक स्वरूपात आहे त्याचेच ज्ञानेंद्रियांना ज्ञान होते. आणि तुमचे ज्ञान पाच ज्ञानेन्द्रियांपुरते मर्यादीत असल्यामुळे तुम्हाला जीवन म्हणून जी प्रत्येक गोष्ट माहित आहे ती केवळ भौतिक आहे : तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना, तुमच्या जीवनउर्जा, हे सगळं भौतिक आहे. समजा, तुम्ही भौतिक अस्तित्वाकडे एक वस्त्र, एक कपड्याचा तुकडा म्हणून बघितलं... असं म्हणा तुम्ही भौतिकतेच्या वस्त्रावर जगत आहात. तुम्ही ह्या वस्त्रावर चालत आहात आणि तुम्ही ज्यावर चालत आहात तेच सर्व सत्य आहे. परंतु जेव्हा तुम्ही वर बघता तेव्हा वर फार मोठी पोकळी आहे असे वाटते आणि तिथे सुद्धा तुम्ही केवळ भौतिक गोष्टीच ओळखू शकता; तुम्ही तारे, सूर्य किंवा चंद्र बघता- जे सर्व भौतिक आहेत. जे भौतिक नाही त्याची तुम्हाला जाणीव होत नाही. तुम्ही ज्याला मंदिर म्हणता ते म्हणजे ह्या वस्त्रामध्ये एक छिद्र पाडण्यासारखे आहे, अशी जागा जिथे भौतिकता विरळ होत जाते आणि त्याच्या पलीकडचे काहीतरी तुमच्या नजरेस पडते. भौतिकतेचे प्रकटीकरण कमी करण्याचे शास्त्र म्हणजेच प्राण प्रतिष्ठा करण्याचे शास्त्र, ज्यायोगे भौतिकतेच्या पलीकडचे आयाम नजरेस पडतात किंवा दृश्यमान होतात. हे साधर्म्य अजून पुढे वाढवले तर मंदिरं म्हणजे भौतिकतेच्या वस्त्रामध्ये असे छिद्र आहे ज्यामधून तुम्ही सहज पलीकडे जाऊ शकता.




आजकाल मंदिरे ही शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रमाणे बांधली जात आहेत -कॉंक्रीट, लोखंड आणि सर्व काही वापरून आणि कदाचित त्याच उद्देश्याने, कारण सर्व काही व्यापार होऊन बसला आहे. जेव्हा मी मंदिरांविषयी बोलतो तेव्हा प्राचीन काळी मंदिर जशी तयार केली जात होती त्याविषयी बोलत आहे. ह्या देशामध्ये, प्राचीन काळी मंदिर फक्त शिवासाठी बांधली जात होती, इतर कोणासाठीही नाही. बाकीची मंदिरं ही नंतर उदयास आली कारण लोकांचा भर तात्पुरत्या लाभाकडे वळू लागला. हे शास्त्र वापरून त्यांनी बाकीच्या इतर आकृती तयार करायला सुरुवात केली ज्याचा फायदा आरोग्य, संपत्ती, कल्याण आणि इतर खूप गोष्टींसाठी होऊ शकतो. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आणि देवता तयार केल्या. तुम्हाला धन हवे असेल तर तुम्ही एक प्रकारची देवता तयार करता जी तुम्हाला त्या गोष्टीसाठी मदत करेल. किंवा जर तुम्ही भीतीने ग्रस्त असाल तर तुम्ही दुसऱ्या देवतेची आकृती तयार करता. ही मंदिरं मागील 1100 ते 1200 वर्षांमध्ये उदयास आली पण त्याच्या अगोदर शिव मंदिरं सोडली तर दुसरी कुठलीही मंदिरं ह्या देशामध्ये नव्हती. शिव ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ 'जे नाही ते' असा आहे. म्हणजेच मंदिरं 'जे नाही' त्याच्यासाठी बांधले होते. 'जे आहे' ती भौतिक सृष्टी आहे पण 'जे नाही ते' भौतिकतेच्या पलीकडे आहे. म्हणून मंदिर हे एक असे छिद्र आहे ज्यामधून तुम्ही 'जे नाही' त्या जागेत प्रवेश करता. या देशामध्ये हजारो शिव मंदिरं आहेत आणि त्यामध्ये विशेष काही अशी आकृती नाही. त्यामध्ये प्रतीकात्मक आकृती आहे, सर्व साधारणपणे ते लिंग असते. लिंग या शब्दाचा अर्थ आकृती आहे. आपण त्याला 'आकृती' म्हणतो कारण जेव्हा अव्यक्त प्रकृती व्यक्त व्हायला सुरुवात होते किंवा दुसऱ्या शब्दात जेव्हा सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा पहिला आकार जो तिने धारण केला तो लंबवर्तुळाकार होता. एक अचूक लंब वर्तुळाकाराला आपण लिंग म्हणतो. आजकाल विश्वाचा अभ्यास करणाऱ्या आधुनिक शास्त्रज्ञांनी हे पुष्कळ मार्गांनी ओळखले आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक आकाशगंगेचा गाभा नेहमी लंब वर्तुळाकार असतो. म्हणजेच त्याची सुरुवात नेहमी लंब वर्तुळाकार किंवा लिंग स्वरुपात झाली आणि त्यानंतर अनेक गोष्टी बनल्या. आणि आम्हाला अनुभवावरूनही हे माहित आहे की, जेव्हा आपण ध्यानाच्या खोल अवस्थेत जातो, ज्यावेळी सर्वकाही विलय होण्याचा क्षण येतो त्यागोदर पुन्हा एकदा शक्ती लंबवर्तुळाकार किंवा लिंग रूप धारण करते.




म्हणजेच पहिला आकार हा लिंग आहे आणि अंतिम आकार ही लिंग आहे; मधली अवस्था ही सृष्टी आहे, जे पलीकडे आहे ते शिव आहे. म्हणून लिंगाचा आकार हा ह्या सृष्टीच्या वस्त्रामध्ये एक छिद्र आहे. भौतिक सृष्टी इथे आहे; मागील द्वार हे लिंग आहे, पुढील द्वार हे लिंग आहे. म्हणून मी मंदिरांना केवळ एक छिद्र असे संबोधत असतो ज्याच्याद्वारे तुम्ही पलीकडे पोहचू शकता, मंदिराची हीच मूळ संकल्पना आहे. भारतातील अति प्रभावी अशा पहिल्या पन्नास व्यक्तींमध्ये सदगुरूंची गणना होते. ते योगी, द्रष्टे आणि न्यूयार्क टाइम्सचे सर्वोत्तम विक्री असलेले लेखक आहेत. भारत सरकारने 2017 मध्ये त्यांना त्यांच्या असाधारण आणि प्रतिष्ठित कार्याबद्दल पद्म विभूषण हा पुरस्कार देऊन गौरवान्वित केले. हा भारतातील, वार्षिक उच्च नागरी पुरस्कार आहे. त्यांनी कॉन्शीयस प्लॅनेट - माती वाचवा, ही जगातली सर्वांत मोठी लोक मोहीम सुरू केली आहे जिला 3.19 अब्ज लोकांनी पाठींबा नोंदविला आहे.



(या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखातील व्यक्त झालेली मते संबंधित लेखकाची स्वतःची आहेत. एबीपी माझा किंवा एबीपी नेटवर्कची ही मते किंवा भूमिका नाही.)