नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात चार दिवसांत झालेल्या रेल्वेच्या दोन दुर्घटना रेल्वे बोर्ड अध्यक्षांना भोवल्या आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष एके मित्तल यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे मित्तल यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.


रविवारी उत्कल एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरुन 22 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसचे डबे घसरले. यानंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष आदित्य कुमार मित्तल यांनी राजीनामा दिला आहे.

रविवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने मित्तल यांच्यासह उत्तर विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आर के कुलश्रेष्ठ आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर एन सिंग यांना पुढील सूचना येईपर्यंत सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं होतं. रेल्वे मंत्र्यांनी उत्कल एक्स्प्रेस अपघाताची जबाबदारी घेण्याचे आदेशही दिले होते.

'रेल्वे बोर्डाकडून कुठलीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. प्राथमिक माहितीच्या आधारे जबाबदार व्यक्ती शोधून काढण्याचे आदेश मध्य रेल्वे बोर्डाला दिले आहेत' अशी माहिती सुरेश प्रभूंनी ट्विटरवर दिली होती.

https://twitter.com/sureshpprabhu/status/899138366209490949