Congress Guarantees: कर्नाटकमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केलं आणि पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या पाचही आश्वासनांची पूर्ती केली आहे. त्यानंतर राहुल गांधींनी लगेचच 'जो हम कहते हैं, उसे पूरा करते हैं!' असं ट्वीट केलं आहे. रविवारी बंगळुरूच्या खचाखच भरलेल्या श्री कांतीराव स्टेडियमध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah )यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनाही शपथ देण्यात आली.
दरम्यान, शपथविधीसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला उपस्थित होते. यावेळी शपथविधीच्या कार्यक्रमात विरोधकांची एकजूट दिसून आली. तर या सोहळ्यात विरोधी पक्षांचे 10 हून अधिक महत्वाचे नेते उपस्थित होते.
काँग्रेसने कर्नाटक निवडणूक प्रचारात पाच आश्वासने दिली होती. त्यांना पहिल्यात मंत्रिमंडळात बैठकीत मंजुरी देण्यात आली.
- 'गृह ज्योती' योजनेंतर्गत प्रत्येक घरासाठी 200 युनिटची वीज मोफत देण्यात येणार आहे
- 'गृह लक्ष्मी' योजनेंतर्गत कुटुंबप्रमुख असलेल्या महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्यात येतील.
- 'युवा निधी' योजनेच्या माध्यमातून पदवीधर आणि पदविका घेतलेल्या बेरोजगार तरुणांना भत्ता देण्यात येणार आहे
- 'उचित प्रयत्न' योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना राज्य परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे
- 'अन्न भाग्य' योजनेच्या माध्यमातून दारिद्रय रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 10 किलो धान्य मोफत देण्यात येणार आहे
उद्धव ठाकरेंची अनुपस्थिती
सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित आहेत. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून काँग्रेसकडून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. मात्र ठाकरे गटाकडून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
हे ही वाचा :