मुंबई: तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या नव्या संसदेचं उद्धाटन होणार आहे. नव्या भारताची ताकद दर्शवणाऱ्या नव्या संसदेच्या इमारतीचे उद्धाटन 28 मे याच दिवशी करण्यामागचं कारण मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही. पण याच दिवशी भाजपसाठी स्मरणीय असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Vinayak Damodar Savarkar Birth Anniversary) जन्मदिन साजरा केला जातो. त्यामुळे सावरकरांच्या जन्मदिनादिवशीच नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात येत आहे. हा निव्वळ योगायोग आहे की मोदी सरकारची काही रणनीती आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे. 


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकमधील भगूर या गावी झाला. सुरुवातीला 'मित्रमेळा' आणि नंतर 'अभिनव भारत' या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा सुरू केला. नंतरच्या काळात परदेशात जाऊन ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी स्वातंत्र्यलढा सुरू ठेवला. तुरुंगातून सुटका झाल्यांनंतर त्यांनी सामाजिक कामांवर भर दिला. पण महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये नथूराम गोडसेसोबत त्यांचं नाव आलं. 


गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या पत्रांवरुन आरोपांची राळ उठवली. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजप नेहमी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. भाजपला सावरकरांचा एवढा आदर आहे तर त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा असं आव्हान काँग्रेसमधील काही नेत्यांकडून सातत्याने दिलं जातं. 


काँग्रेसकडून सावरकरांवर होणाऱ्या सातत्याने टीकेवर आता मोदी सरकारने हा मास्टरस्ट्रोक दिल्याची चर्चा आहे. भारतरत्न (Bharatratna) नव्हे तर त्याहून मोठा सन्मान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा करण्यात येणार असून त्यामुळेच नव्या संसदेच्या उद्धाटनाचा मुहूर्त हा 28 मे रोजी ठेवला असल्याची चर्चा आहे. 


संसदेच्या नव्या इमारतीचे उद्धाटन हे 28 मे रोजी ठेवणं आणि सावरकरांची जयंती त्याच दिवशी असणं हा काही निव्वळ योगायोग नक्कीच नाही. त्यामागे मोदी सरकारची मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे. त्यातून काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या टीकेला सरकारच्या कृतीतून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असेल. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतंही काम असंच करत नाहीत, त्यामागे काहीतरी मोठं कारण नक्कीच असतं. ब्रिटिशकालीन वास्तू असलेली जुनी संसद आता नव्या ठिकाणी स्थलांतरीत होणार असून त्यासाठी तब्बल 1200 कोटी रुपयांचा सेंट्रल व्हिस्टा हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील नव्या संसदेची इमारत हे मोदी सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे याच्या बांधणीवर सुरुवातीपासूनच त्यांचं बारीक लक्ष होतं. 


संसदेची ही नवी इमारत चार मजली असून त्याला सहा प्रवेशद्वार आहेत. त्यामध्ये लोकसभेचे एक हजार तर राज्यसभेचे 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. नव्या संसदेमध्ये प्रत्येक खासदाराच्या समोर एक छोटेखानी टेबल असून त्यावर सर्व आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा आहेत. 


काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता. त्याचवेळी नव्या संसदेचा पहिला लूक समोर आला होता. त्यानंतर आता त्याच्या उद्धाटनाची तारीश समोर आली आहे. 


ही बातमी वाचा :