नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "ना टेस्ट आहे, ना हॉस्पिटलमध्ये बेड आहे, ना व्हेन्टिलेटर आहे, ना ऑक्सिजन आहे, कोरोनाची लसही नाही. फक्त एका उत्सवाचा ढोंग आहे. पंतप्रधानांना याची कोणतीही चिंता नाही."
देशात कोरोनाच्या लसीच्या तुटवड्याच्या बातम्या येत असताना या प्रश्नावरूनही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर 11 एप्रिलपासून देशात लस उत्सव सुरू करण्यात आला. तो 14 एप्रिलपर्यंत साजरा करण्यात आला. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू होता. 'लस उत्सव' या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात आलं. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे.
लस उत्सवाच्या पहिल्या दिवशी 30 लाख डोस, दुसऱ्या दिवशी 40 लाख डोस आणि तिसऱ्या दिवशी 25 लाखाहून जास्त डोस तर चौथ्या दिवशी 33 लाख डोस देण्यात आले आहेत. लस उत्सवाच्या या चार दिवसांच्या दरम्यान देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून या चारच दिवसांमध्ये एक कोटीहून जास्त नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
- Poila Baisakh | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या बंगाली जनतेला 'पोइला बोइशाख'च्या शुभेच्छा, जाणून घ्या काय आहे त्याचे महत्व
- भविष्यात अफगाणिस्तान स्थिर असणे हेच भारत आणि पाकिस्तानच्या हिताचं : अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन
- Covid-19 : Remdesivir चे उत्पादन दुप्पट करण्याची सरकारची परवानगी, याच आठवड्यात होणार किंमती कमी