नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यासमोर एक पाऊल मागे घेत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीच्या बुरारी मैदानावर आंदोलन करावे असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. तर शेतकरी रामलीला मैदान किंवा जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत गेली चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे.


आता या प्रश्नावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन दिले होते. उत्पन्न दुप्पट झाले पण ते शेतकऱ्यांचे नाही तर अंबानी-अदानी यांचं. जे लोक अजूनपर्यंत काळ्या कृषी कायद्यांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत ते शेतकऱ्यांच्या समस्या काय सोडवणार?"






शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर मांडला ठिय्या
दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच आडवण्यात आलं आहे. त्यामुळे सिंघु आणि टिकरी बॉर्डरवरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. शेतकऱ्यांच्या या पवित्र्यामुळे महामार्गावरील वाहतूक जाम झाली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार नवे कृषी कायदे परत घेण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतकरी सिंघु बॉर्डरवरच आंदोलन करतील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.


शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत जाणारे महामार्गावरील वाहतूक जाम झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना दिल्लीतील बुरारी मैदानावर आंदोलन करण्याचे आवाहन केलं आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेसाठी आमंत्रण देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.


मह्त्वाच्या बातम्या:


Farmers Protest | केंद्र सरकार अखेर नरमलं, आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चेचा प्रस्ताव
Farmers Protest | मोदी सरकारच्या क्रूरतेच्या विरोधात देशातल्या शेतकऱ्यांचा यल्गार: राहुल गांधी
Farmers Protest: वॉटर कॅनन बंद करणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या 'हिरो' वर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Farmers Protest | कृषी कायद्यांविरोधात अन्नदात्याचा 'आरपार'चा पवित्रा, दुसऱ्या दिवशीही शेतकरी आक्रमक