नवी दिल्ली: दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी त्यांच्यावर करण्यात आलेल्या पाण्याच्या फवाऱ्याला बंद करणाऱ्या अंबालाच्या एका युवकावर हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वॉटर कॅनन बंद करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 26 वर्षीय नवदीप सिंह हा शेतकरी आंदोलनाचा 'हिरो' झाला आहे.


बुधवारी दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी पोलीसांनी त्यांच्यावर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला होता. त्यावेळी हरियाणातल्या अंबाल्याच्या शेतकरी नेत्याचा मुलगा असलेल्या नवदीप सिंहने त्या गाडीवर चढून पाण्याचा फवारा बंद केला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.


 


शेतकरी नेत्याच्या या पुत्रावर आता पोलीसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यासाठी कायद्यात आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.


नवदीप सिंहने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी वडीलांच्या सोबत शेती करायला सुरुवात केली. माझे वडील एक शेतकरी नेते आहेत. मी आतापर्यंत कधीही बेकायदेशीर कृत्यांत सामील झालो नाही. शेती आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा म्हणून वॉटर कॅनन बंद करण्याचे धाडस केले.


नवदीपने सांगितले की, "केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला शांतीपूर्वक विरोध करण्यासाठी आम्ही दिल्लीला चाललो होतो. परंतु पोलिसांनी आमचे रस्ते बंद केले. सरकारच्या चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर अशा प्रकारचे लोकहिताविरोधात कायदे करण्यात येत असतील तर त्याला आमचा कायम विरोध असेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींच्या हवाली करण्याचा घाट घातलाय."


दरम्यान केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून त्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मोर्चाला सीमेवरच रोखण्यासाठी पोलीसांनी गेले तीन दिवस दिल्लीच्या सीमा बंदिस्त करुन प्रचंड फौजफाटा तैनात केला आहे.


महत्वाच्या बातम्या: