New Parliament Building: नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी करण्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करणे चुकीचे असल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसेच या 'नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं, पंतप्रधानांनी नाही' असं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. नव्या संसद भवनाचं काम पूर्ण झाल्यावर त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावं असा आग्रह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केला होता. या संदर्भातली माहिती लोकसभेच्या सचिवालयाकडून गुरुवारी देण्यात आली.
परंतु राहुल गांधींच्या वक्तव्यावर आता भाजपाकडून पलटवार करण्यात आला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'नवं संसद भवन उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींचं कोणतही चांगलं काम राहुल गांधी यांना पाहवत नाही.' असं म्हणतं त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
काँग्रेसने साधला होता निशाणा
याआधी काँग्रेसने नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणाऱ्या तारखेवर देखील आक्षेप घेतला होता. नवीन संसद भवनाचं उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. त्याच दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असते. त्यामुळे '28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणे हा योगायोग आहे की भाजपाची कोणती नवी रणनिती आहे' असा सवाल देखील काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे.
तसेच काँग्रेसने नव्या संसद भवनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'व्यक्तीगत महत्त्वकांक्षा असणारी योजना' म्हणत त्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. काँग्रेसने या इमारतीवर आक्षेप घेत, 'विरोधकांचा आवाज बंद केला असताना अशा इमारतीची काय गरज आहे' असं देखील म्हटलं होतं.
संसदेची ही नवी इमारत चार मजली असून त्याला सहा प्रवेशद्वार आहेत. त्यामध्ये लोकसभेचे एक हजार तर राज्यसभेचे 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे. नव्या संसदेमध्ये प्रत्येक खासदाराच्या समोर एक छोटेखानी टेबल असून त्यावर सर्व आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वत: पंतप्रधानांनी या कामाचा आढावा घेतला होता.