नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. परंतु ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यांच्या या परदेश दौऱ्यावर भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवली जात असतानाच आता काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांच्या आजी आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी सांगितलं. कधीतरी पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यायला सांगा, सगळेच प्रश्न राहुल गांधींना का असा सवालही त्यांनी विचारला. राजीव सातव यांनी 'एबीपी माझा'सोबत साधला, त्यावेळी ते बोलत होते.


महिनाभर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणाही साधला होता. पण, आज काँग्रेसच्या स्थापना दिनाच राहुल गांधी इटलीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची तुफान चर्चा सुरु आहे. त्यातच "राहुल गांधी यांची भारतातील सुट्टी संपली आहे. आता ते इटलीला परत गेले आहेत," असं म्हणत भाजप नेते गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.


आजारी आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले : राजीव सातव
भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राजीव सातव म्हणाले की, "आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर कोणीही सगळ्या गोष्टी सोडून जाईल. त्यांच्या आजीची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले आहेत. कोरोनाचं संकट मोठं असेल असं राहुल गांधी यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं त्यावर सरकारने लक्ष दिलं? लाखो शेतकरी सीमेवर आंदोल करत आहेत, सरकार लक्ष द्यायला तयार आहेत? मागच्या सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी एकही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाहीत, त्याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही. देशासमोरच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने उत्तर दिलेलं नाही. या मुद्द्यांवर मागच्या सहा वर्षात कोणी संघर्ष केला असेल तर तो राहुल गांधी यांनी. मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली, रस्त्यावर बसलेल्या लाखो शेतकऱ्यांबद्दल एक शब्द बोलायला तुम्ही तयार नाहीत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्याची चर्चा करायला तयार नाही."


काँग्रेसच्या वर्धापन दिनीच राहुल गांधी इटलीला रवाना 


काँग्रेस अध्यक्षा दिल्लीत, राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याला विरोधाचं कारण नाही: अशोक चव्हाण
राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याला विरोध करण्याचं काही कारणं नाही. काँग्रेस अध्यक्षा दिल्लीत आहेत. कामानिमित्त परदेशी गेले आहेत, त्यावर टीका करायची गरज नाही. यावर फार भाष्य करणं उचित नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.


विरोधी पक्षाकडे फारसं लक्ष देऊ नये : बाळासाहेब थोरात
राहुल गांधी कोणत्या कारणासाठी परदेशात गेले हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण ते समजून घेतलं नाही तर गैरसमज करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचा असतोच. त्यामुळे विरोधी पक्षाकडे फारसं लक्ष देऊ नये. महत्त्वाच्या कामाकरता कधीकधी जावं लागतं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या टीकेवर दिली. "भाजपने शेतकर आंदोलनाचे प्रश्न सोडवण्याच आणि कृषी कायदे रद्द करण्याचा विचार करावा," असा सल्लाही बाळासाहेब थोरात यांनी दिला.


आजारी आजीला पाहण्यासाठी जाण्यात चूक काय? : काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल
काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांच्या इटली दौऱ्यावरुन भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे महासचिव के से वेणुगोपाल म्हणाले की, "राहुल गांधी त्यांच्या आजीला पाहण्यासाठी गेले आहेत. त्यात चुकीचं काय? प्रत्येकाला वैयक्तिक दौऱ्यावर जाण्याचा अधिकार आहे. भाजप अतिशय खालच्या स्तराचं राजकारण करत आहे. ते राहुल गांधी यांना लक्ष्य करत आहेत कारण त्यांना एकाच नेत्याला लक्ष्य करायचं आहे."




Rahul Gandhi | काँग्रेसच्या वर्धापन दिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परदेश दौरा चर्चेत