Congress Leader Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आज ईडी चौकशीला गैरहजर राहणार आहेत. अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) सध्या आजारी असून रुग्णालयात दाखल आहेत. आईसोबत रुग्णालयात थांबण्यासाठी आज ईडी चौकशीला गैरहजर राहण्यासंदर्भात राहुल गांधी यांनी ईडीकडे पत्र लिहून परवानगी मागितली होती. राहुल गांधी यांची ही विनंती ईडीनं मान्य केली आहे. त्यामुळे राहुल गांधी आज ईडी चौकशीला गैरहजर राहणार असून आईसोबत रुग्णालयात थांबणार आहेत. आज रात्री राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्यासोबत दिल्लीच्या सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये थांबणार आहेत.


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी याआधी राहुल गांधी यांची ईडीने सलग तीन दिवस चौकशी झाली आहे. ईडीनं राहुल गांधी यांची सुमारे 30 तास चौकशी केली आहे. यादरम्यान मनी लाँडरिंग कायद्यान्वये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.


तीन दिवसांत 30 तास चौकशी
राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर ईडी आणखी काही बड्या लोकांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यंग इंडियन प्रकरणात ईडीने राहुल गांधी यांची तीन दिवस 30 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांची बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली.


तांत्रिक प्रश्नांवर राहुल गांधी यांचं मौन 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी संपूर्ण स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, यंग इंडिया कंपनी ही नफ्यासाठीची कंपनी नाही किंवा कोणताही संचालक या कंपनीकडून वैयक्तिकरित्या नफा घेऊ शकत नाही. काँग्रेसचे माजी दिग्गज नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे खात्यांतील व्यवहारांची माहिती असायची. अनेक तांत्रिक प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी मौन पाळलं आणि यासंदर्भात आपल्या सीएला विचारू किंवा माहिती गोळा करू, असं सांगितल्याचा दाव सूत्रांनी केला आहे.